भाजपाच्या पहिल्या यादीत माजी मंत्री खडसेंचे नाव नसल्याने कार्यकर्ते संतप्त


श्री क्षेत्र कोथळीत खडसेंच्या निवासस्थानबाहेर समर्थकांची घोषणाबाजी : आता अन्याय बस्स!

मुक्ताईनगर : भाजपाचे ज्येष्ठ नेते व सलग सहा टर्मपासून आमदार असलेल्या एकनाथराव खडसे यांचे नाव भाजपाच्या पहिल्या यादीत न आल्याने त्यांचे कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले आहेत. श्री क्षेत्र कोथळीतील खडसेंच्या निवासस्थानाबाहेर समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत खडसे साहेब, आगे बढोची घोषणाबाजी केली तर भाजपाकडून सातत्याने अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली. याप्रसंगी समर्थकांनी सामूहिक राजीनामे देण्याचा पवित्रा घेतला असून खडसे यांनी त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे.

नेतृत्व डावलण्याचा प्रयत्न
केंद्रातील दुसर्‍या फळीतील ज्येष्ठ नेते असलेल्या खडसेंना पहिल्या यादीत स्थान नसल्याने विविध तर्क-वितर्क लढवले जात आहे. खडसेंना दुसर्‍या यादीत आता तिकीट मिळेल की नाही? याबाबतही संभ्रम आहे मात्र दुसरीकडे खडसेंनीदेखील दुसर्‍या यादीची प्रतीक्षा करणार असल्याचे सांगत आशावादी असल्याचे दर्शवले आहे. मूळात खडसेंपेक्षा ज्युनियर असलेल्या उमेदवारांना पहिल्या यादीत स्थान मिळाल्याने ही बाब समर्थकांच्या जिव्हारी लागणारी आहे. तब्बल 42 वर्षांपासून पक्षासाठी खस्ता खाणार्‍या खडसेंसाठी ही बाबदेखील जिव्हारी लागणारी आहे मात्र त्यांनी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देण्यास आता नकार दिला आहे. पक्षश्रेष्ठी आता दुसर्‍या यादीत खडसेंना स्थान देतात वा नाही? हे लवकरच कळणार आहे मात्र भाजपाकडून खडसेंवर सातत्याने अन्याय सुरू असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत असून आता मात्र अन्याय बस्स ! या मानसिकतेत कार्यकर्ते आले आहेत. असे असलेतरी खडसे मात्र यावर काय भूमिका घेतात? याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.



दुसर्‍या यादीत खडसेंना संधी ?
भाजपातर्फे बुधवारी दुसरी यादी जाहीर होण्याची दाट शक्यता असून या यादीत मात्र खडसेंना संधी मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त होत आहे. पक्षश्रेष्ठी अर्थात कुणाला संधी देतात? हेदेखील तितकेच महत्वाचे आहे शिवाय खडसेंना पर्यात मुक्ताईनगरातून कोण असेल वा सेनेच्या वाट्याला ही जागा मिळते वा नाही? हेदेखील पाहणे आता औत्सुक्याचे ठरले आहे. खडसेंनी मात्र शांत राहून पक्षविरोधी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही हेदेखील विशेष!


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !