रक्षाबंधनहून परतणार्‍या भावाचा अपघाती मृत्यू


मयत खडका गावातील रहिवासी : दुचाकी घसरल्याने अपघात

खडका : काही तासांपूर्वी बहिणीकडून राखी बांधून आलेल्या खडका येथील रहिवासी असलेल्या 55 वर्षीय भावाचा मुक्तळ ते सुरवाडा दरम्यान झालेल्या अपघातात मृत्यू झाला. जालमसिंग नयनसिंग चौधरी (वय 55) असे मयत भावाचे नाव आहे. खडका (ता.भुसावळ) येथील रहिवासी जालमसिंग नयनसिंग चौधरी हे रक्षाबंधनासाठी रविवारी सकाळी पत्नी कल्पना यांच्यासह मलकापूर येथील सासरवाडीला गेले होते. तेथे सासरे उमरावसिंग दशरथ पाटील यांच्याकडे पत्नीला सोडून ते मलकापूर जवळील घिर्णी बेलाड या गावी राहणार्‍या त्यांच्या बहिण मिराबाई फुलसिंग राजपूत यांच्याकडे गेले. तेथे मीराबाई यांनी भाऊ जालमसिंग यांना राखी बांधून गोडधोड पाहुणचार केला. त्यानंतर ते दुचाकी (क्रमांक एमएच.19-एआर.7166) ने दुपारी दोन वाजता बोदवड येथे आले. दरम्यान, त्यांचे शेत सुरवाडे येथे असल्याने शेलवड-सुरवाडे मार्गे शेत पाहून खडका येथे जाऊ या उद्देशाने ते निघाले. मात्र दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुक्तळ ते सुरवाडे दरम्यान रस्त्यात त्यांची दुचाकी घसरून कडेला पडली. त्यात चेहर्‍याला गंभीर ईजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बहिणीची भेट घेऊन आलेल्या भावाचा रक्षाबंधनाच्या दिवशी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आहे. धीरज गोविंदसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरून बोदवडला मृत्यूची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !