महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा
फैजपूर : परीसरातच नव्हे तर संपूर्ण भारतभर ज्यांचे अफाट कार्य असलेल्या सेवाभावी व्यक्तिमत्व महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या सरळ पद्धतीने शनिवारी साजरा केला. देशात कोरोना महामारीचे संकट असताना कोणताही खर्चिक तथा भाविकांना कष्टदायक ठरेल असा कार्यक्रम न करता अत्यंत साध्या पद्धतीने महाराजांनी त्यांचा वाढदिवस सतपंथ मंदिर संस्थानमध्ये साजरा केला. सकाळी सात वाजता मंदिर संस्थानच्या शेतात गुरु जगन्नाथ महाराज यांच्या समाधी स्थळावर पूजा करून गुरुवर्यश्रींचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर हनुमंत रायाचे दर्शन घेऊन सतपंथ मंदिरात तमिळनाडू येथून आलेले भाविक हरिलाल पटेल यांनी सपत्नीक महाराजांचे पाद्य पूजन केले. यावेळी महाराजांची उपस्थित भाविकांच्या सान्निध्यात बुंदी तुला करण्यात आली. यावर्षी महाराजांनी मंदिरात राहूनच सर्व श्रद्धावानांचे शुभेच्छा व आशीर्वाद स्वीकारले. शनिवारी दिवसभर धार्मिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मंदिरात येऊन महाराजांचे अभीष्टचिंतन केले.





