आपसात प्रकरणांचा निपटारा झाल्यास वादी-प्रतिवादींना समाधान : न्या.एम.एस.बनचरे


यावल : न्यायालयात दीर्घकाळ खटले चालवण्यापेक्षा लोक अदालतीत मध्यस्थी करून आपसात तडजोड करून तत्काळ प्रकरणांचा निपटारा केल्यास वादी व प्रतिवादी दोघांनाही समाधान मिळते. कोण हरलं कोण जिंकलं हे न होता दोघेच जिंकतात म्हणून अधिकाधिक प्रमाणावर पक्षकारांनी लोकअदालतीत मध्यस्तीच्या माध्यमातून आपल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावल न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायाधीश एम.एस.बनचरे यांनी केले. ते शुक्रवारी येथील न्यायालयामध्ये कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते.

यावलला कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर
न्यायालयामध्ये शुक्रवारी तालुका विधी सेवा समिती आणि स्थानिक वकील संघाच्या माध्यमातून कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्रथमवर्ग न्या.एम.एस.बनचरे होते. शिबिराचे उद्घाटन सहदिवाणी न्या.व्ही.एस.डामरे यांच्या हस्ते करण्यात आले.




25 रोजी यावलला लोकअदालत
शिबिरात न्या.एम.एस.बनचरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, येत्या 25 सप्टेंबर रोजी यावल न्यायालयामध्ये लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर पक्षकारांनी न्यायालयात न्याय प्रतीक्षेत दीर्घकाळ रेंगाळत असलेली प्रकरणांमध्ये समेट घडवून आणला पाहिजे व मध्यस्ती या माध्यमातून तडजोड करीत समतोल निकाल लावून घेतला पाहिजे. कारण न्यायालयात खटला चालवतांना वादी किंवा प्रतिवादी यातील एक जिंकतो तर एकाचा पराभव होतो मात्र जर तुम्ही मध्यस्तीच्या माध्यमातून तडजोड करीत प्रकरण निकाली काढले तर दोघांनाही विजय प्राप्त होतो. या कायदेविषयक शिबिरात सह दिवाणी न्या.व्ही.एस.डामरे, वकील संघाचे सचिव अ‍ॅड.निलेश मोरे, अ‍ॅड.एस.आर.लोंढे, अ‍ॅड.यु.सी.बडगुजर, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी एस.एस.तडवी, अ‍ॅड.देवेंद्र बाविस्कर, सरकारी वकील अ‍ॅड.फरीद शेखसह सर्व वकील संघाचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन अ‍ॅड. ए.आर.सुरडकर यांनी तर आभार न्यायालय कक्ष अधीक्षक एस.बी. शुक्ला यांनी मानले. शिबिराच्या यशस्वितेसाठी अधीक्षक एस. बी.शुक्ला, सी.एम.झोपे, के.के. लोंढेसह कर्मचार्‍यांनी परीरश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !