भुसावळातील रस्त्यांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा
आमदार संजय सावकारे यांच्या सूचना : शहरातील रस्त्यांच्या प्रश्नी भुसावळातील शासकीय विश्रामगृहात बैठक
भुसावळ : भुसावळातील रस्त्यांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा 12 कोटींच्या निधीतील कामांना तातडीने गती द्यावी तसेच काही प्रश्न वा समस्या असतील त्या तातडीने सोडवा मात्र शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करून नागरीकांना दिलासा द्यावा, अशा सूचना आमदार संजय सावकारे यांनी येथे केल्या. शनिवारी शासकिय विश्रामगृहात रस्त्यांच्या प्रश्नी बैठक घेण्यात आली.



यांची बैठकीला उपस्थिती
शहरातील रस्त्यांच्या प्रश्नी शनिवारी दुपारी शासकिय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, ठेकेदार विनय बढे आदी उपस्थित होते.
अडीच कोटींची बिले थांबली
या बैठकीत आमदार संजय सावकारे यांनी शहरातील रस्त्यांची कामे का थांबली? याबाबत विचारणा केली असता ठेकेदार विनय बढे यांनी पालिकेकडून तब्बल अडीच कोटी रुपयांची बिले मिळाली नसल्याने काम बंद असल्याचा खुलासा केला. यावर मुख्याधिकारी चिद्रवार यांनी पालिकेच्या बँक खात्यांच्या अडचणी, कर्मचार्यांची सुटी आदींबाबतच्या समस्या मांडल्या. यावर आमदार सावकारे यांनी काय प्रश्न व समस्या असतील त्या तातडीने सोडवा मात्र 12 कोटींच्या निधीतील कामांना तातडीने गती द्या, अशी भुमिका मांडली.
नागरीकांना द्यावा दिलासा
शहरात मंजूर रस्त्यांपैकी केवळ 60 टक्के रस्त्यांचे बीबीएम झाले असून बीबीएम झालेल्या रस्त्यांवरही सिलकोट व कारपेट झाले नाही. नागरीक व वाहनधारकांना बीबीएम झालेल्या खडबडीत रस्त्यांवरुन वाहनधारकांना चालावे लागत आहे. रस्त्यांवरुन पाण्याचा निचरा करणे, तसेच सिलकोट व कारपेटचे काम तातडीने पूर्ण करावे, असेही आमदार सावकारे यांनी या बैठकीत सांगितले. शहरातील नागरीकांना प्रचंड त्रास होत असल्याने तांत्रिक अडचणी तत्काळ सोडवाव्या असेही यावेळी सूचित करण्यात आले. यावर मुख्याधिकारी चिद्रवार यांनी या दोन ते तीन दिवसांत बिलांचा प्रश्न मार्गी लागून कामाला सुरवात होईल, यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.


