विवरे बु.॥ ग्रामसभेत महावितरणवर दोन कोटी कर आकारणीचा ठराव
रावेर : गत आठवडयात वीज वितरण कंपनीने धडक कारवाई करीत गावातील पाणीपुरवठा वीज पंप व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडीत केला. यामुळे गावातीत पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून पथदिवे बंद असल्याने गाव अंधारात आहे. ग्रामपंचायतीचा कर आकारणी व वसुलीचा अधिकाराचा वापर करीत वीज वितरण कंपनीच्या हद्दीतील विद्युतखांब, रोहित्र, टॉवर, उच्च दाब वाहिन्यांवर कर आकारणी करण्याचा प्रस्ताव माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य वासुदेव नरवाडे यांनी ग्रामसभेत मांडला. यानुसार वीज वितरण कंपनीकडून दोन कोटींचा कर वसूल करण्यात येणार असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात सुमारे दोन कोटीच्या कराचीभर पडणार आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी सरपंच इनुस तडवी, उपसरपंच भाग्यश्री पाटील, माजी सरपंच वासुदेव नरवाडे, रेखा गाढे, ललिता पाचपांडे, युसूफ खाटीक, नौशाद बी.ईस्माईल, विनोद मोरे, विपीन राणे, पूनम बोंडे, शिवाजी पाटील, निलीमा सणंसे, दीपक राणे, ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते आदी उपस्थित होते.



ग्रामपंचायतीला कर वसुलीचा अधिकार
जसा वीज वितरण कंपनीला थकबाकी वसुलीचा अधिकार आहे तसा ग्रामपंचायत स्वायत्ता संस्था असल्याने आपल्या हद्दीतील व्यावसायीकांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 124 कर फी नियम 66 भाग 7 ( ब ) अन्वये महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीवर कर लावण्याचा अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करून विवरे बु.॥ हद्दीतील वीज वितरण कंपनीच्या मालमत्ते वर रेडीरेकर दर प्रणाली नुसार कर व सेवा कर लावण्याचा प्रस्ताव ग्रामसभे समोर ठेवून मंजूर करण्यात आला असल्याचे ग्रामपंचायत सदस्य वासु नरवाडे यांनी सांगितले.


