एक गाव, एक गणपती संकल्पना राबवा
बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांचे गणेशोत्सव मंडळ पदाधिकार्यांना आवाहन
भुसावळ : एक गाव, एक गणपती संकल्पना ग्रामीण भागात राबवली जाते त्याचप्रमाणे शहरातही संकल्पना राबवावी त्यामुळे खर्चात बचत होवून गर्दी नियंत्रणात राहील व या अनुषंगाने आपला निर्णय जाहीर करावा, असे आवाहन बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांनी येथे केले. गुरूवारी सायंकाळी पाच वाजता शहरातील गणेश मंडळ पदाधिकार्यांची बैठक अहिल्याबाई कन्या विद्यालयात झाली. भागवत म्हणाले की, एक शहर एक गणपती बसविण्याचा निर्णय सर्व मंडळाच्या पदाधिकार्यांनी घ्यावा, येत्या दोन दिवसात पुन्हा गणेश मंडळ पदाधिकार्यांची मोठी बैठक होणार आहे, त्यात त्यांनी सांगावे त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
वाजंत्री लावल्यास कायदेशीर कारवाई
बैठकीत मार्गदर्शन करताना निरीक्षक भागवत म्हणाले की, कुठल्याही गणेश मंडळाला वाजंत्री वाजविण्याची परवानगी मिळणार नाही, कुठल्याही मंडळाने वाजंत्री लावल्यास कायदेशीर कारवाईला त्या मंडळाच्या पदाधिकार्यांना सामोरे जावे लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मिरवणुका काढण्यावर मनाई केली आहे. कोरोनाचे नियम प्रत्येकाला पाळायचे आहे. आपण काय देखावा सादर करणार आहात याचीही माहिती पोलिसांना प्रथम द्यावी लागणार आहे. ग्रामीण भागात ज्या प्रमाणे एक गाव एक गणपती बसविला जातो, त्याच धर्तीवर एक शहर एक गणपती बसवावा तसेच दररोज दोन ते तीन मंडळाच्या पदाधिकार्यांनी आरती व पूजा करावी, असे आवाहन त्यांनी केले.



एक वॉर्ड, एक गणपती संकल्पनाही उत्तम
काही मंडळाच्या पदाधिकार्यांनी एक शहर एक गणपती ऐवजी एक वॅार्ड एक गणपती ही संकल्पना राबवावी, असे आवाहन केले. यावर सर्वांनी विचार करून कोरोनामुळे प्रत्येकाने एका वॅार्डात एक गणपती बसवावा जेणे करून गर्दीही कमी होईल आणि कोरोनाचे नियम पाळले जातील, असे बैठकीत सांगितले. संदीप परदेशी, सचिन पोळ यांनी यावेळी सहकार्य केले.


