आघाडी सरकारचा केवळ घोषणांवर भर : माजी मंत्री गिरीश महाजन
रावेर : कोरोना व नैसर्गिक संकट राज्यावर असताना दिड वर्षांपासून घरात बसून असलेले उद्धव ठाकरे हे कसले लोकप्रिय मुख्यमंत्री असा प्रश्न उपस्थित करीत त्यांच्या काळात मंत्रालयात 40 हजार फाईल पेंडींग असून त्यांना मंत्रालयाची पायरी चढायला सुध्दा भीती वाटते, अशी बोचरी टिका राज्याचे माजी मंत्री माजी मंत्री गिरीष महाजन यांनी केली. ओंकारेश्वर (ता.रावेर) येथे भारतीय जनता पार्टीचा समर्थ बुथ अभियान अंतर्गत शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुख कार्यकर्ता मेळावा झाला. प्रसंगी ते बोलत होते.
प्रत्येक गोष्टीचे केंद्रावर खापर
माजी मंत्री महाजन म्हणाले की, प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्रावर फोडण्याचे काम आघाडी सरकार करीत, स्वतः कुठलेही काम करायचे नाही मात्र नुसत्याच घोषणा करायचा, असे सुरू असून पाऊस आला नाही त्यासाठी केंद्राला जवाबदार ठरवले जात असल्याचे ते म्हणाले. चाळीगावात एव्हढे नैसर्गिक संकट आले परंतु अद्याप राज्य सरकारने मदत केलेली नाही. तेथील भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जेसीबी, पोकलॅण्ड आणून कन्नड घाट साफ सुरू करण्याच्या कामाला वेग दिला मात्र शासनाने अद्याप डिझेलचे सुध्दा पैसे दिले नाहीत मात्र निव्वळ घोषणा देणे सुरू असल्याचे ते म्हणाले.



यांची होती प्रमुख उपस्थिती
खासदार रक्षा खडसे, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, जिल्हा परीषद अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हा परीषद सदस्य नंदकिशोर महाजन, कैलास सरोदे, नंदा पाटील, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, अजय भोळे, पंचायत समिती सभापती कविता कोळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, उपसभापती धनश्री सावळे, पंचायत समिती सदस्य योगीता वानखेडे, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, माजी उपसभापती सुनील पाटील, अमोल पाटील, शहराध्यक्ष दिलीप पाटील, माजी शहराध्यक्ष उमेश महाजन, शिवाजीराव पाटील, हरलाल कोळी आदी भाजपा पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
भाजपाच्या बैठकीला झेरॉक्स कॉपी चालणार नाही
निवडणूक तोंडावर असतांना मेळाव्यात काही महिला लोकप्रतिनिधींनी दांड्या मारल्या. यावर भाजपाकडून आढावा घेणारे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे यांनी किती पंचायत समिती सदस्य उपस्थित आहे? असा प्रश्न उपस्थित केला असता गोपाळ नेमाडे यांनी हात वर केला. यावर अजय भोळे नाराज होऊन बैठकीला लोकप्रतिनिधींना आणावे झेरॉक्स कॉपी चालणार ाही, असे त्यांनी सुनावले.


