निमखेडीच्या बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला : खुनाचा संशय
मुक्ताईनगर पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात : मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना
मुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी खुर्द गावातील 40 वर्षीय इसम बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी मुक्ताईनगर पोलिसात चौघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेला 24 तास उलटत नाही तोच बेपत्ता इसमाचा मृतदेह सारोळा शिवारातील बोदवड रस्त्यावर मंगळवारी आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली. मयताचा खून करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून या प्रकरणी पोलिसांनी चौघांना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. या घटनेत विजय दिनकर डहाके (40, निमखेडी) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, डहाके यांचा मृतदेह सारोळा शिवारातील एका कपाशीच्या शेतात आढळल्यानंतर खळबळ उडाली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळचे उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, मुक्ताईनगर निरीक्षक राहुल खताळ आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जमाव आक्रमक झाला होता. दोषींवर कारवाई होईपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, असा पवित्रा जमावाने घेतल्यानंतर पोलिसांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.





