भुसावळ बसस्थानक परीसरातील खड्डे उद्या बुजवणार
उपनगराध्यक्षा सोनीताई संतोष बारसे यांची माहिती : वाहनधारकांची खड्डेमय रस्त्यातून होणार मुक्तता
भुसावळ : भुसावळ शहरातील स्टेशन रस्त्याची सर्वाधिक दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले असतानाच पालिकेच्या माध्यमातून गुरुवारी या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येणार असल्याची माहिती उपनगराध्यक्षा सोनीताई संतोष बारसे यांनी दिली. बारसे म्हणाल्या की, शहरवासीयांना होणारा त्रास लक्षात घेता गुरुवारी सकाळी 10.30 वाजता बसस्थानक परीसरासह जुन्या पालिका कार्यालयासमोरील खड्डेदेखील बुजवण्यात येणार आहेत. किमान रस्त्यांची डागडूजी होणार असल्याने खड्डेमय रस्त्यातून वाहनधारकांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.
डांबरीकरणालाही मिळावा मुहूर्त
स्टेशन रस्त्याच्या दुरुस्तीबाबत रेल्वे व पालिकेने हात वर केले आहेत. खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांनी यांनी रेल्वे अधिकार्यांसोबत बैठक घेत रस्ता दुरुस्तीची सूचना केली पण अधिकार्यांनी जुमानलेले नाही. रेल्वे व पालिका प्रशासनाने तातडीने या संदर्भात बैठक घेवून रस्ता डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



रस्त्यांच्या दुर्दशेवरून पालकमंत्री झाले संतप्त
शहरातील रस्त्यांचे बीबीएम झाले मात्र अद्याप सिलकोट व कारपेटचा पत्ता नाही. नवीन मंजुरी मिळालेल्या रस्त्यांच्या कामाला गती नाही. याबाबत तक्रारी प्राप्त होताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना संपर्क साधून भुसावळच्या रस्त्यांचा सत्यानाश थांबवा, अशा सूचना केल्या. शहरात पालिकेने 12 कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे सुरु केली खरी पण अद्यापही एकाही प्रमुख रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. बीबीएमवर गाडे अडकले आहे. इतर योजनांमधून मंजूर रस्ते कामांना सुरूवात नाही. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी मुख्याधिकारी चिद्रवार यांना संपर्क करून शहरातील खड्डे पडलेल्या रस्त्यांची यादी वाचून दाखवली. बीबीएम झालेल्या या रस्त्यांवर सिलकोट, कारपेटची कामे करा. अन्यथा भुसावळातील रस्त्यांचा सत्यानाश होईल, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.
ही बातमी वाचली का- भुसावळातील रस्त्यांचा सत्यानाश थांबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील


