साकेत एक्स्प्रेसचा अपघात टळला : भुसावळात बदलला डबा
रेल्वे कर्मचारी आशिष चौधरी यांच्या दक्षतेचे रेल्वे प्रशासनाकडून कौतुक
भुसावळ : सतर्क रेल्वे कर्मचार्याच्या दक्षतेमुळे साकेत एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळल्याची घटना शनिवार, 11 रोजी घडली. रेल्वे प्रशासनाने भुसावळात साकेत एक्स्प्रेसचा डबा बदलल्याचा निर्णय घेतला. पावणेचार तासांच्या विलंबानंतर एक्स्प्रेस पुढील प्रवासाला रवाना झाला. रेल्वे कर्मचारी आशिष चौधरी यांनी दाखवलेल्या सतर्कतेचे रेल्वे प्रशासनाने कौतुक केले आहे.
निरीक्षणादरम्यान आढळला बिघाड
एलटीटी-फैजाबाद 01067 साकेत एक्स्प्रेस भुसावळ रेल्वे स्थानकावर शनिवारी दुपारी 1.2 वाजता आली असता निरीक्षणादरम्यान गाडीच्या बोगी क्रमांक एस- 9 च्या डब्याचे चाक फुलले असल्याचे रेल्वे कर्मचारी एमसीएम आशीष चौधरी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी हा प्रकार वरीष्ठ अधिकार्यांना सांगितला. यावेळी अधिकार्यांनी गाडी थांबल्यावर एस-9 या डब्याच्या चाकाची पाहणी केली असता, डब्याचे एक चाक फुलल्याने ते आवाज करीत असल्याने डबा बदलण्याचा निर्णय अधिकार्यांनी घेतला. स्टेशन सचालक जी.आर. अय्यर व अन्य अधिकार्यांनी तातडीने या डब्यातील प्रवाशांना खाली उतरवले व चाक खराब झालेला डबा (एलएचबी कोच) बदलून तेथे एसी-3 चा डबा जोडण्यात आला.



पावणे चार तासांच्या विलंबाने धावली गाडी
गाडी मुंबईकडून येतांना एकाही रेल्वे कर्मचार्यांच्या लक्षात हा प्रकार कसा आला नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापूर्वी नाशिक रोड स्थानकापासून कोणीही कशी तपासणी केली नाही, याची चौकशी आता रेल्वे प्रशासनाकडून केली जाणार आहे. यासाठी रेल्वेचे अधिकारी,कर्मचारी कामाला लागल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, रेल्वे कर्मचारी आशीष चौधरी यांनी दाखवलेल्या सतर्कतेचे कौतुक होत आहे. कर्मचार्याच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला.


