सहा महिन्यात यावल रस्त्याची वाताहत : खड्ड्यांना भुसावळकर वैतागले

निकृष्ट रस्ता कामाची चौकशीची मागणी : शहरात व्हावीत दर्जेदार कामे


भुसावळ : एक कोटी दहा लाख रुपये खर्चातून अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच यावल रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले मात्र अवघ्या सहा महिन्यातच रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांसह शहरवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पावसामुळे दिवसागणिक रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वाढ होत असल्याने वाहनधारकांना अधिक मनस्ताप सोसावा लागत आहे. दर्जेदार काम करण्याबाबत आमदारांनी वारंवार सूचना केल्यानंतरही ठेकेदाराने सूचनांना हरताळ फासत निकृष्ट काम केल्याने त्याची शिक्षा शहरवासीयांना भोगावी लागत आहे. शहरातील वर्दळीच्या रस्त्यांची आधीच वाताहत झाली असता आता यावल रस्त्याचा नंबर लागल्याने शहरवासीयांच्या संतापात अधिक भर पडली आहे.

एकाच ठेकेदाराला दोनवेळा मिळाले काम
यावल रस्त्याच्या दोन हजार 300 मीटर अंतराच्या रस्त्याचे काम गत अर्थसंकल्पात मंजूर झाले होते. शिवाय त्यासाठी एक कोटी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यापूर्वी या रस्ता कामाची निविदा काढूनही तांत्रिक अडचणींमुळे काम न झाल्याने पुन्हा निविदा प्रक्रिया बोलाविल्यानंतर त्याच ठेकेदाराला काम मिळाले मात्र वर्षभरानंतरही ठेकेदाराकडून काम होत नसल्याने आमदारांनी या संदर्भात आवाज उठवताच रस्ता कामाला 1 फेब्रुवारी रोजी सुरूवात झाली मात्र कामाच्या दोन दिवसानंतर ठेकेदाराने डांबर नसल्याचे कारण पुढे करीत काम बंद पाडले होते. त्यानंतर पुन्हा मंगळवार, 16 मार्चपासून कामाला सुरूवात करण्यात आली.




सहा महिन्यातच रस्त्यावर पडले खड्डे
राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोरील यावल रस्त्यापासून तापी नदीपर्यंतच्या एकूण दोन हजार 300 मीटर रस्त्याचे काम ठेकेदाराकडून करण्यात आले. त्यासाठी एक कोटी 10 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कामात तापी नदी पुलावर कारपेट टाकणे, स्मशानभूमीजवळील कामासह यावल रस्त्याच्या डांबरीकरणाचा समावेश होता. एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्चूनही निकृष्ट पद्धत्तीने काम करण्यात आल्याने अवघ्या सहा महिन्यात यावल रस्ता खड्डेमय झाल्याने शहरवासीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावल रस्ता कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना : आमदार
रस्त्याचे काम दर्जेदार करण्याबाबत आपण वारंवार सूचना केल्या मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागास रस्त्याच्या स्थितीबाबत कळवण्यात आल्याचे आमदार संजय सावकारे म्हणाले. या रस्त्याच्या प्रश्‍नी विरोधकांनी आंदोलन केले होते मात्र आता रस्त्याची दुरवस्था झाल्यानंतर विरोधक का गप्प आहेत? असा प्रश्‍न आमदारांनी उपस्थित केला.

पावसाळा संपताच रस्ता दुरुस्ती : सा.बां.विभाग
पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून रस्त्याची निश्‍चितच दुरवस्था झाली आहे. कंत्राटदार वाय.एम.महाजन यांना एक महिन्यांपूर्वीच यावल रस्त्यावरील खड्ड्यांबाबत पत्र देण्यात आले असून पावसाळा संपताच रस्त्याची दुरवस्था थांबवण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता परशुराम ठाकूर म्हणाले. तीन वर्षापर्यंत रस्ता दुरुस्तीची जवाबदारी कंत्राटदाराची असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !