धाडसी घरफोडी ; चार लाखांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला
शिरपूर : घर बंद राहत असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह 3 लाख 85 हजाराची सोन्याचे दागिने लंपास केले. शिरपूर शहरातील शहरातील निमझरी नाका परीसरात असलेल्या प्रियदर्शन कॉलनीत 16 सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.
बंद घर चोरट्यांच्या पथ्यावर
शहरातील निमझरी नाक्यावरील प्रियदर्शनी कॉलनीत प्लॉट क्रमांक 38 मधील स्वतःच्या दुमजली इमारतीत वरच्या मजल्यावर दुर्गेश डिगंबर सोनवणे हे आपल्या आई व पत्नीसह राहतात. दुर्गेश माळी यांच्या आई आजारी असल्याने त्यांना दोन-तीन दिवसांपासून शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, 15 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता दुर्गेश माळी दवाखान्यात निघून गेले तर त्यांच्या पत्नी नातेवाईकांकडे मुक्कामी गेल्या. हीच संधी चोरट्यांनी साधून रात्री 9 ते 16 सप्टेंबर सकाळी 10 वाजेच्या दरम्यान घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करीत चोरी केली.



या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला
चोरट्यांनी कपाटातील 30 हजार रोख रक्कम व साधारणतः 12 तोळे आणि 6 गॅम वजनाची सोन्याची दागिने चोरुन नेले. त्यात एक लाख 50 हजार रुपये किंमतीची 6 तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत, 50 हजार रुपये किंमतीचे एक तोळे वजनाचे सोन्याचे तीन कडे, एक लाख रुपये किंमतीच्या चार तोळे वजनाच्या चार सोन्याच्या बांगडया, 25 हजार रुपये एक तोळे वजनाचे सोन्याचे कानातील, 15 रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 15 हजार रुपये किंमतीच्या पाच ग्रॅम वजनाच्या 5 सोन्याच्या लहान अंगठया व 30 हजार रुपये रोख असे एकूण 3 लाख 85 हजार रुपये किंमतीचे 12 तोळे 6 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केले. ही घटना गुरुवार, 16 सप्टेंबर रोजी सकाळी दुर्गेश माळी घरी परतल्यावर उघडकीस आली. शहर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख, एपीआय गणेश फड पथकासह दाखल झाले.तसेच चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान व फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले.


