धूम स्टाईल आठ चोर्यांचा उलगडा : दोघे आरोपी जिल्हा पेठ पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची पत्रकार परीषदेत माहिती
जळगाव : शहरातून तब्बल आठ महिलांच्या सोनसाखळ्या चोरणार्या मुसक्या जिल्हा पेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने आवळल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परीषद घेऊन ही माहिती दिली. संदीप रोहिदास सोनवणे (33, रा.श्रमिकनगर, नाशिक) व सतीश गोविंद चौधरी (33, रा.शरदनगर, मालेगाव नाशिक) अशी अटकेतील संशयीताची नावे आहेत. यावेळी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे हे उपस्थित होते.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर चोरट्यांचा माग
डॉ.मुंढे यांनी सांगितले की, पथकाने सोनसाखळी चोरीच्या घटना घडलेल्या परीसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानुसार दोघांनी डिस्कव्हर कंपनीच्या दुचाकीवर सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर 8 सप्टेंबर रोजी औरंगाबाद शहरात जबरी सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता. पथकाने औरंगाबादकडे जाणार्या रस्त्यावरील सर्व हॉटेल्स, ढाबे, लॉज येथून माहिती घेतली. सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलिस नाईक सलीम तडवी, रवींद्र साबळे, विकास पहूरकर, समाधान पाटील व विनोद पाटील यांचे पथक नाशिक येथे तपासासाठी गेले होते. पाच दिवस तेथे थांबून पथकाने मुख्य संशयिताला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने मालेगाव येथील साथीदाराबाबत माहिती दिली. त्यालाही मालेगाव येथून ताब्यात घेण्यात आले. यापूर्वी त्यांनी जळगाव शहरात वेगवेगळ्या आठ ते दहा ठिकाणी जबरी सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अशाच प्रकारे सोनसाखळी चोरी केल्याची माहिती संशयितांनी पोलिसांना दिली. संशयितांकडून अद्याप चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला नाही. जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हार्डवेअर दुकानातील चोरीचाही पथकाने उलगडा केला असून चोरट्यांकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.




