दहा हजारांची लाच घेताना दोघे पोलीस एसीबीच्या जाळ्यात
पुणे : दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दहा हजारांची लाच घेताना पकडल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. अपघाताच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणी हवेली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगलट आली आहे. सहा. पोलिस उपनिरीक्षक श्रीपती माणिक कोलते (५५) आणि पोलिस नाईक शिवाजी बाळासाहेब जगताप (३४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार यांच्यावर हवेली पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आवश्यक ती मदत करण्यासाठी कोलते याने तक्रारदार यांच्याकडे १० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाच लुचपतने २६ ऑगस्ट रोजी पडताळणी केली. त्यावेळी १० हजार रूपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. सिंहगड रस्त्यावरील अभिरूची पोलिस चौकी समोर मंगळवारी सापळा रचण्यात आला. कोलते यांच्यावतीने जगताप याला १० हजार रूपयांची लाच घेताना अटक करण्यात आली.





