अमळनेर उपमुख्याधिकार्‍यांवर हल्ला ; दोघांना सात वर्षांची शिक्षा


अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

अमळनेर : धुळे रस्त्यावर पालिका उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्यावर चाकूहल्ला करून पाच हजार रुपये लुटण्यात आल्याची घटना 2 नोव्हेंबर 2019 रोजी रात्री 11.30 वाजता घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होवून अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. या गुन्ह्यातील दोघा आरोपींना न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली.

लूट करणार्‍या दोघांना शिक्षा
नाशिकला जाण्यासाठी उपमुख्याधिकारी गायकवाड हे धुळे रोडवर उभे होते. त्यावेळी धुळ्याकडून दुचाकीने (क्रमांक एम.एच.19-7503) संशयीत कुणाल विजय शिंपी (रा.शिवशक्ती चौक, बाहेरपुरा), आकाश शंकर शिंदे (रा.गलवाडे रोड) व एक अल्पवयीन संशयीत असे तिघे आले. त्यांनी गायकवाड यांच्या हातातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिघांनी गायकवाड यांच्या खिशातून पाच हजार रुपये काढून घेतले. तसेच डाव्या बरगडीवर व मांडीवर दोन ठिकाणी चाकू हल्ला करून संशयित पसार झाले. गायकवाड यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध जबरी चोरी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तर अल्पवयीनाचा खटला बाल न्यायालयात पाठवण्यात आला होता. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी चोरीची निघाली. त्याबाबत स्वतंत्र गुन्हा दाखल आहे.दरम्यान, सरकारी वकील अ‍ॅड.किशोर बागुल यांनी तपासाधिकारी पोलिस उपनिरीक्षक जी.बी.सूर्यवंशी, नायब तहसीलदार कमलाकर जोशी यांच्यासह 11 साक्षी तपासल्या. जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.आर.जोशी यांनी दोघांना सात वर्षांचा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !