शेतकर्यांना तत्काळ मदत करा अन्यथा आंदोलन : डॉ.विवेक सोनवणे
मुक्ताईनगर : केळीसाठी प्रसिद्ध असणार्या जळगाव जिल्ह्यात शेतकर्यावर आज सी.एम.व्ही.व्हायरसचे संकट पुन्हा आल त्यातच आधीच लॉकडाऊनमुळे शेतकर्यांच्या मालाला भाव मिळालेला नसताना मागील वर्षी पंचनामे होऊन सुद्धा शेतकर्यांना कुठल्याही प्रकारची मदत शासनाकडून मिळालेली नाही. शेतकर्यांना तत्काळ मदत करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डॉ.विवेक सोनवणे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
वर्षभरापासून सीएमव्ही व्हायरसचे संकट
मुक्ताईनगर तालुक्यात केळीवर सी.एम.व्ही.व्हायरसचे संकट आले असून हे व्हायरसचं संकट 2020 आणि आता 2021 मध्ये म्हणजे आता सुद्धा आले आहे. या संकटामुळे केळी उत्पादक शेतकर्यांना आपल्या 20-20, 25-25 हजार केळीच्या बागाच्या-बागा उपटून फेकाव्या लागल्या परंतु अद्यापपर्यंत सुद्धा भरपाई मिळालेली नाही. बर्हाणपूर कृषी मंडीतून केळी उत्पादक शेतकर्यांची मोठ्या प्रमाणत आर्थिक पिळवणूक केली जाते. मे महिन्यात झालेल्या चक्रीवादळामुळे शेतकर्यांचे अधिक नुकसान झाले व या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून करण्यात आले परंतु शेतकर्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळालेली नाही. यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरी शासनाच्या व प्रशासनाच्या विरोधात प्रचंड नाराजी व असंतोष व्यक्त होतांना दिसत आहे. केळीवर आलेल्या सी.एम.व्ही.व्हायरस (कुकुम्बर मोझँक व्हायरस) याचे पंचनामे करून भरपाईपोटी थेट अनुदान शेतकर्यांच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी डॉ.सोनवणे यांनी केली असून शेतकर्यांना पुन्हा वार्यांवर सोडण्यात आले तर मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकर्यांना सोबत घेऊन तालुक्यात शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार, असल्याचा इशारा डॉ.विवेक सोनवणे यांनी दिला आहे. या संदर्भात निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषीमंत्री दादाजी भुसे यांना पाठवण्यात आले आहे.




