काकांकडे चोरी : पुतण्या जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


जळगाव : मुंबईतील मुलाकडे गेलेल्या पारोळा येथील भागवत सुकलाल चौधरी यांच्या घरात त्याचा पुतण्या बंटी उर्फ नाट्या जितेंद्र चौधरी यानेच डल्ला मारल्याची बाब समोर आल्याने एलसीबीच्या पथकाने पुतण्याला शुक्रवार, 24 सप्टेंबर रोजी सकाळी अटक केली. बंटी उर्फ नाट्या जितेंद्र चौधरी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

काका गावाला जाताच मारला डल्ला
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पारोळा येथील रहिवाशी भागवत सुकलाल चौधरी यांच्या घरात अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना 22 सप्टेंबर रोजी उघडकीला आली होती. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच तपास जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत असतांना भागवत चौधरी यांच्या गल्लीत राहणारा त्यांचा पुतण्या बंटी उर्फ नाट्या जितेंद्र चौधरी याने आधीही चोर्‍या केल्या असल्याची गोपनीय माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेने बंटी चौधरीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्यानेच काकाच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली. तसेच काकाच्या घरात नुकतेच लहान मुलाचे लग्न झाले असल्यामुळे घरात सोने व रोख रक्कम असेल व त्या रक्कमेतून हॉटेल व्यवसाय सुरू करू त्या उद्देशाने चोरी केल्याचेही त्याने एलसीबीच्या पथकाला सांगितले. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपी बंटी चौधरी याला पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !