भुसावळात शस्त्र बाळगणार्या 29 संशयीतांची पोलिसांकडून ओळख परेड
गुन्हेगारी थोपवण्यासाठी पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर : पुन्हा गुन्हे केल्यास खैर नाही : पोलीस उपअधीक्षकांची तंबी
भुसावळ : शहरात गेल्या काही दिवसात पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढल्यानंतर पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. गुन्हेगारी थोपवण्यासाठी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाकडून विविधांगी उपाययोजना राबवण्यास सुरूवात झाली आहे. शनिवारी दुपारी चार ते सहा दरम्यान शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये दाखलगुन्ह्यातील संशयीतांची दुय्यम कारागृहाच्या आवारात 29 संशयीत आरोपींची ओळख परेड घेण्यात आली. यावेळी उपअधीक्षक वाघचौरे यांनी संबंधिताना पुन्हा गुन्हेगारीकडे न वळण्याची तंबी देत पुन्हा गुन्ह्यांमध्ये सहभाग आढळल्यास गाठ आपल्याशी असल्याचा सज्जड इशारा दिल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली.
29 संशयीतांची ओळख परेड
शहरात आर्म अॅक्टनुसार गुन्हे दाखल असलेल्यांचा शोध पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे आदींनी घेतला. यानंतर 29 जणांना डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या समक्ष हजर करण्यात आले. प्रत्येकाकडून इंटरोगेशन फॉर्म भरून घेण्यात आले. त्यात संबंधित व्यक्ती सध्या कोणासोबत राहते? कोणते वाहन वापरतात? त्यांचे मित्र कोण आहेत ही माहिती विचारून संबंधितांचे छायाचित्र घेण्यात आले. प्रत्येकावर कोणती प्रतिबंधक कारवाई करावी? याचा आढावा घेण्यात आला. याशिवाय जे गुन्हेगारी सोडून इतर कामधंद्याला लागले आहेत त्यांना चांगल्या वर्तणुकीची समज देण्यात आली. दोन्ही पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.



उत्सवांसह निवडणुका शांततेत पार पडण्याचे नियोजन
आगामी कालावधीत दुर्गोत्सव असून दोन महिन्यानंतर शहरातील नगरपालिका निवडणुका भयमुक्त व शांततेच्या वातावरणात पार पाडण्याचे पोलीस प्रशासनाचे नियोजन आहे. त्या अनुषागाने गुन्हेगारी थोपवण्यावर पोलीस प्रशासनाने भर दिला आहे.


