गणेशोत्सवातील सजावट कुटूंबाला एकत्र ठेवते : आमदार संजय सावकारे
रोटरी रेल सिटीच्या गणेशोत्सव स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
भुसावळ : सध्याच्या काळात कुटुंबातील सदस्यांनीही एकत्र येणे काळाची गरज आहे. उत्सवकाळात घरातील गणपती समोरील सजावटीच्या निमित्ताने हे सदस्य एकत्र येतात त्यामुळे मुलांवरही चांगले संस्कार होतात, असे मत आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केले. भुसावळ रोटरी क्लब ऑफ रेल सिटीतर्फे आयोजित स्व.प्रसन्न देव स्मृती गणेशोत्सव घरगुती सजावट स्पर्धेच्या पारीतोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल डॉ गोविंद मंत्री, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ.मकरंद नारखेडे, रेल सिटीचे अध्यक्ष हरविंदरसिंग ठेठी, सचिव आशिष अग्रवाल, प्रोजेक्ट चेअरमन श्रीकांत जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.
कुटूंबातील एकोप्यासाठीही उत्सवाची गरज
सावकारे पुढे म्हणाले की, आज कुटूंबातील संवाद हरवत आहे. घरात सजावट करायची म्हंटले की, सदस्यांमध्ये संवाद वाढतो. कल्पनांची व विचारांची देवाण-घेवाण होते. लोकमान्य टिळकांनी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी उत्सव सुरू केले. आता कुटूंबातील एकोप्यासाठीही उत्सवाची गरज आहे. सार्वजनिक मंडळांनी उत्सवकाळात होणारे ध्वनिप्रदूषण थांबवावे तसेच गणेश मूर्ती लहान आणून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे सावकारे म्हणाले. डॉ.मकरंद नारखेडे, डॉ.गोविंद मंत्री यांचीही भाषणे झाली.



स्पर्धेतील विजेते असे-
यावेळी उत्सवकाळात सामाजिक उपक्रम राबविल्या बद्दल अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, सामाजिक पर्यावरण व प्रदुषण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांचा विशेष पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धेतील
विजेते पुढीलप्रमाणे- गट क्र. 1- प्रथम क्रमांक – अनुष्का दीपेश सोनार, व्दितीय क्रमांक- डॉ.मृणाल चेतन पाटील, तृतीय क्रमांक- रजनी संजय सावकारे, गट क्रमांक दोन- प्रथम क्रमांक- विशाल अरुण पोतदार, व्दितीय क्रमांक- पंकज शांताराम नेवे, तृतीय क्रमांक – किरण म. सोहळे. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. रेल सिटीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी यांनी सूत्रसंचलन केले. प्रास्ताविक प्रोजेक्ट चेअरमन श्रीकांत जोशी यांनी तर पाहुण्यांचा परीचय प्रोजेक्ट को-चेअरमन संदीप सुरवाडे यांनी करुन दिला. अध्यक्ष हरविंदरसिंग ठेठी यांनी आभार मानले.
