भुसावळातील रणजीतसिंग राजपूत यांचा हरीयाणात सन्मान
भुसावळ : शहरातील रणजीतसिंग राजपूत ह्यांना कुरुक्षेत्र, हरीयाणा येथे राष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय युवा सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराचे वितरण हरीयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे ओएसडी व प्रतिष्ठित लोकसंगीत कलाकार गजेंद्र फोगाट व हरीयाणा युवा आयोगाचे अध्यक्ष मुकेश गौड यांच्याहस्ते कुरुक्षेत्र येथील कला भवनात करण्यात आले. यावेळी हरीयाणा कला परीषदेचे अध्यक्ष प्रा.संजय भसीन तसेच नुकताच टोकियो ओलंपिक मध्ये पदक विजेता व आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू सुरेंद्र कुमार व राष्ट्रीय सामाजिक संघटनचे चेअरमन जितेंद्र नरवाल व प्रदीप मेहला उपस्थित होते.
पुरस्कार मिळाल्याची दखल
भुसावळातील रणजीतसिंग राजपूत यांना नुकताच राष्ट्रीय युवा पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे. या पुरस्काराची दखल घेत त्यांना हरीयाणा येथे गौरवण्यात आले. दरम्यान, हरीयाणातील कार्यक्रमात आपण कसे घडलो या बद्दल राजपूत यांनी मार्गदर्शन केले. युवक क्षेत्रात कार्य करीत असतांना एका छोट्याशा शहरापासून केलेल्या कार्याची दखल हे केंद्र स्तरापर्यंत कश्या प्रकारे पोहचते ह्या संपूर्ण कार्याचा प्रवास युवकांसमोर राजपूत यांनी मांडला.



सन्मानाने भारावले : रणजीतसिंग राजपूत
श्री कृष्णाच्या पदस्पर्शाने पावन कुरुक्षेत्र हरीयाणाच्या भूमीवर मला माझा जीवनप्रवास मांडण्याची संधी राष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या वतीने मिळाली तसेच राष्ट्रीय युवा सन्मान देऊन गौरविण्यात देखील आले याचा मला खूप आनंद होत असल्याचे पुरस्कार्थी रणजीतसिंग राजपूत म्हणाले.
