भुसावळातील वीज मीटर रीडींग एजन्सीची मान्यता रद्द करावी : शिवसेना
भुसावळ : शहरातील अनेक ग्राहकांना चुकीचे वीज देयक देण्यात आले असून ही समस्या गेल्या एक वर्षांपासून सुरु असल्याने वीज मीटर रीडींग एजन्सीची मान्यता रद्द करावी, अशी मागणी कार्यकारी अभियंता यांच्या भेटीत शिवसेना पदाधिकार्यांनी केली. मामाजी टॉकीज परीसर, जुना सातारा, खळवाडी, अयोध्या नगर, काशीराम नगर, श्री नगर, गणेश कॉलनी परीसरातील दगडू उत्तम रोकडे, सुनील अर्जुन पाटील, जयश्री प्रकाश कोलते, हेमंत वसंत जोशी, नलिनी अरुण तळेले, नितीन कमलाकर खरे, एकनाथ लक्ष्मण सुरवाडे, युवराज रतन ठाकूर या वीज ग्राहकांच्या वीज देयकाच्या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे तालुका संघटक प्रा. धीरज पाटील, शहरप्रमुख बबलू बर्हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील, उपशहर संघटक संदीप ठाकूर ग्राहकांनी कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे यांची भेट घेवून वीज रीडींग घेणार्या एजन्सीची मान्यता रद्द करण्याची मागणी केली.
रीडींग एजन्सीचा मनमानी कारभार
दोन वर्षांपूर्वी जीनस कंपनीने नवीन मीटर बसविले परंतु साधारण 40 टक्के मीटर अपडेट केले नाहीत तर रीडींग एजन्सी मनमानी कारभाराने फेक रिडींग ग्राहकांच्या देयकात समाविष्ट करीत आहे. 20 टक्के ग्राहकांना अजूनही दुसर्याच ग्राहकांच्या वापराची देयके देत आहेत. रीडींग एजन्सीच्या भोंगळ कारभाराची तक्रार अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती. रीडींग एजन्सीमुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो तसेच महावितरणच्या अधिकार्यांचे काम वाढते, असे प्रा.धीरज पाटील यांनी सांगितले. कोरोना नंतरसुद्धा रिडींग घेतले जात नाहीय. अनेक घरामध्ये फक्त ज्येष्ठ नागरीक राहतात त्यांच्याकडे अँड्राईड फोन किंवा साधा फोन सुद्धा नाही, असे ग्राहक स्वतःच्या वीज वापराचे रिडींग कसे पाठवणार? असा सवाल शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांनी केला.



शिवसेना कार्यालयात साधावा संपर्क
जळगाव रोड परीसरातील ग्राहकांना चुकीची देयके आली असल्यास शिवसेना विभागीय कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन माजी नगरसेवक दीपक धांडे, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील यांनी केले आहे. दरम्यान, मागील दोन वर्षांपासून तक्रार केल्यावरही चुकीचे बिल देण्यात येत आहे. अधिकारी लक्ष देत नाही. ग्राहक मंचात तक्रार करणार असल्याचे ग्राहक राहुल दगडू रोकडे म्हणाले.
