यावलच्या साठवण तलावात 1.80 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार : नगराध्यक्षांची तक्रार
यावल : यावल शहरातील नवीन साठवण तलाव कामात सुमारे एक कोटी 80 लक्ष रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवींसह काँग्रेसच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकार्यांकडे केल्याने नगरपालिका राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या कामात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचारामुळेच तत्कालीन मुख्याधिर्यांवर एसीबीचा ट्रॅप झाला तर यातील इतर दोषींवर देखील फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नगराध्यक्षांच्या तक्रारीने यावलमध्ये खळबळ
यावल नगरपालिकेच्या नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवींसह काँग्रेसच्या नगरसेवकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साठवण तलाव संदर्भात गंभीर स्वरूपाची तक्रार केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की शहरात नवीन साठवण तलावाकरीता तीन कोटी 05 लक्ष 15 हजार 617 रूपयांना तांत्रिक मंजुरी मिळाली होती व निविदा रक्कम 2 कोटी 84 लक्ष 38 हजार 516 रूपयाची असुन सुरवाती पासुन भष्ट्राचाराचे नियोजन करत सुमारे एक कोटी 80 लाखांचा भ्रष्टाचार झाला आहे. सदर कामाची निविदा नियोजन बाह्य जोपर्यंत अनिल शामराव पाटील यांना मिळत नाही तोपर्यंत काढण्यात आल्या व पात्र कॉन्ट्रॅक्टर यांना रिजेक्ट केले. तलावाची नियोजित जागा ही न मोजता काम सुरू करण्यात आले. व अंदाज पत्रका पेक्षा निम्मा तलाव बांधण्यात आला. या कामात पाटबंधारे विभागा सह महाराष्ट्र जिवन प्राधीकरणची परवानगी आहे व जर कामात काही बदल असल्यास संबधीत विभागाच्या अधिकार्यांची परवानगी आवश्यक होती असे असतांना संबधीतांची मंजुरी न घेता निम्मा तलाव बांधण्यात आला व नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी आणी अभियंता यांनी मक्तेदारासह त्याचा एक भागीदार जो पोलिस दलात आहे तर एक भागीदार जळगाव महानगर पालिकेत नगरसेवक व एका यावल नगरसेवक आहे यांनी संगणमताने भष्ट्राचार केला तसेच काम करतांना अंदाज पत्रकानुसार केले नाही. व भ्रष्टाचार केला. याच कामाच्या पैशाच्या वादामुळे मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.



दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत
या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून संबंधित विरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत व भष्ट्राचाराची रक्कम वसुल करावी व न.पा. तील दोषींना कायमस्वरूपी नोकरीत निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे देताना नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी, काँग्रेसचे गटनेता सय्यद युनूस सय्यद युसूफ, नगरसेवक मनोहर सोनवणे, रजीयाबी गुलाम रसूल, सईदाबी शेख हारून, शमशाद बेगम मोहम्मद खान उपस्थित होते.
