शिक्षण विभागातील लाचखोर लिपिक एसीबीच्या जाळ्यात
अकोला : दोन हजार रुपयांची लाच घेताना अकोला पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या लिपिकास मंगळवारी सायंकाळी एसीबीच्या पथकाने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली. अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून लाचेची रक्कम जप्त करून या आरोपीविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष मनसाराम ताले असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
थकीत वेतन प्रमाणपत्रासाठी मागितली लाच
तक्रारदार हे शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांचे थकीत वेतन काढण्यासाठी लागणारे प्रमाणपत्र देण्यासाठी अकोला पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेला लिपिक संतोष मनसाराम ताले याने दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याने तक्रार नोंदवण्यात आली. पंचायत समितीत लिपिकाने लाचेची रक्कम स्वीकारताच अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीस अटक केली़ ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली़
