कंडारी शिवारातील अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये अतिक्रमण
अपार्टमेंटमधील रहिवाशांची पालिका प्रशासनाकडे तक्रार : पार्किंगची जागा मोकळी करण्याची मागणी
भुसावळ : कंडारी शिवारातील नगरपालिका हद्दीतील सर्वे क्रमांक 181/1 मधील प्लॉट पाचवर उभारण्यात आलेल्या अपार्टमेंटमधील पार्किंगच्या जागेवर अपार्टमेंट मालकाच्या वडिलांनी अनधिकृतपणे बांधकाम केल्याने रहिवाशांना वाहने लावण्यासाठीदेखील जागा नसल्याने रहिवाशांनी पालिका प्रशासनाकडे शुक्रवार, 24 सप्टेंबर रोजी लेखी तक्रार करून अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे.
पार्किंगच्या जागेत बेकायदा बांधकाम
रहिवाशांच्या तक्रार अर्जानुसार मोहित अनिल लाहोटी यांच्याकडून रहिवाशांनी अपार्टमेंट ब्लॉक खरेदी केला. त्यावेळी पार्किंगची जागा दर्शवण्यात आली होती शिवाय अपार्टमेंटच्या प्लॅनमध्येदेखील तसे नमूद आहे मात्र आता मोहिम यांचे वडिल अनिल लाहोटी यांनी बेकायदा पार्किंगच्या जागेत बांधकाम केल्याने रहिवाशांना वाहने जावण्यासाठी जागा उपलब्ध नाही. संबंधिताना अतिक्रमण हटवण्यास सांगितले असता ते उडवा-उडवीचे उत्तर देतात शिवाय जे होईल ते करून घ्या, अशी धमकी देतात, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. पालिका प्रशासनाने अतिक्रमणाबाबत तातडीने दखल घेवून ते बांधकाम पाडावे, अशी मागणी अपार्टमेंटमधील आशिश लता साहोता, कैलास लालवाणी, श्रीश बळीराम जोशी आदींनी केली आहे. दरम्यान, अनिल लाहोटी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अतिक्रमण केले नसल्याचा दावा केला.



