अपेक्षित टक्केवारी न मिळाल्याने यावल नगराध्यक्षांनी केला भ्रष्टाचाराचा आरोप !
यावलच्या पत्रकार परीषदेत यावलचे गटनेता अतुल पाटील यांचा आरोप : म्हणाले भ्रष्टाचाराचा आरोप हास्यास्पद : हवे तर न्यायालयीन चौकशी करा
यावल : यावल नगरपालिकेच्या अतिरीक्त साठवण तलाव उभारणीत भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने पालिकेचे वातावरण ढवळून निघाले असतानाच गुरुवारी गटनेते व नगरसेवक अतुल पाटील यांनी नगराध्यक्षा नौशाद तडवी यांनी केलेला भ्रष्टाचाराचा आरोप हास्यास्पद असल्याचे सांगत अपेक्षीत टक्केवारी न मिळाल्याने नगराध्यक्षा आरोप करीत असाव्यात, असा आम्हाला संशय आहे शिवाय त्यांना भ्रष्टाचाराचा संशय आहे तर ‘दूध का दूध, पाणी का पाणी होवू’ द्या व यावलकरांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी या कामाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी असल्याचे ते म्हणाले.
नगराध्यक्षांनी सखोल माहिती न घेता केला आरोप
यावल नगरपरीषदेच्या माध्यमातून शहराला येणार्या काळात पिण्याच्या पाण्याची उणीव भासु नये या दृष्टीकोणातुन सत्ताधारी गटाचे गटनेते तथा नगरसेवक अतुल पाटील यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी व त्यांच्या सर्व नगरसेवकांनी मिळून एक कोटी 76 लक्ष रुपयांच्या अतिरिक्त साठवण तलावास मंजुरी मिळवली होती. आता हे काम पूर्णत्वास आले असतानाच चार दिवसांपूर्वी नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी व त्यांच्यासह चार नगरसेवकांनी जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्याकडे साठवण तलावाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परीषदेत देखील नगराध्यक्षांच्या मागणीला समर्थन देण्यात आले मात्र सखोल माहिती न घेता नगराध्यक्षांनी हा आरोप केल्याचा दावा पत्रकार परीषदेत गटनेता अतुल पाटील यांनी केला. नगराध्यक्षा तडवी यांच्या संपूर्ण देखरेख व आदेशाव्दारे पुर्णत्वास आलेल्या तलावाची त्यांनीच भ्रष्ठाचार झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करावी म्हणजे हा प्रकार हास्यास्पद तर आहेच शिवाय यावल शहराच्या विकासासाठी अहोरात्र परीश्रम करणार्या नगरसेवकांच्या विश्वासाची प्रतिमा मलीन करण्याचा हे राजकीय षड्यंत्र असल्याची माहिती पाटील यांनी दिली. या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी ही आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलतांना गटनेते अतुल पाटील व सहकारी नगरसेवकांनी दिली.
यांची होती उपस्थिती
या पत्रकार परीषदेला उपनगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी, नगरसेवक प्रा.मुकेश येवले, राकेश कोलते, शेख असलम शेख नबी, समीर शेख मोमीन, नगरसेविका देवयानी धीरज महाजन, रेखा युवराज चौधरी, पौर्णिमा राजेंद्र फालक, शीला श्रीधर सोनवणे, कल्पना दिलीप वाणी, रूख्माबाई भालेराव (महाजन) आदींची उपस्थिती होती.



