चोरट्यांची हुशारी : चोरीनंतर घराला पुन्हा कुलूप लावून पोबारा
जळगाव : बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याचे दागिन्यांसह रोकड मिळून एकूण एक लाख 42 हजारांचा मुद्देमाल लांबवला. गुरुवार, 30 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. फारूख अब्दुल गफुर देशमुख (60, रा.नशेमन कॉलनी, केजीएन दुध डेअरीजवळ मास्टर कॉलनी) हे पत्नी नाहीदाबी देशमुख यांच्यासह राहतात. घरातच किरकोळ किराणा विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार, 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता भुसावळ तालुक्यात वरणगाव येथे राहत असलेली मुलगी हिना पटेल यांच्याघरी भेटण्यासाठी जळगावातील घराला कुलूप लावून गेले होते. मुलीला भेटून गुरूवार, 30 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता घरी आले असता त्यांनी लावलेले कुलूपाऐवजी दुसरे कुलूप लावलेले आढळून आले. त्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला असता घरात चोरी झाल्याचे उघडकीला आले. घरातील लाकडी कॉटमधून सोन्याचे दागिने आणि 65 हजाराची रोकड असा एकूण एक लाख 42 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फारूख देशमुख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अनिसोद्दीन शेख करीत आहे.
