इलेक्ट्रीक मोटारची पीन काढताना विजेचा धक्का लागून विवाहितेचा मृत्यू
अमळनेर तालुक्यातील पाडळसरे गावातील घटना : मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
अमळनेर : सार्वजनिक नळास पाणी आल्यानंतर वीज पुरवठा खंडित झाल्याने इलेक्ट्रीक मोटारीची पीन काढताना विजेचा धक्का लागल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील पाडळसरे येथे घडली. या घटनेत वैशाली संतोष कोळी (34) या विवाहितेचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता ही घटना घडली. अत्यवस्थ अवस्थेत महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात शव विछेदन करून दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास विवाहितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत विवाहितेचे पती संतोष कोळी हा येथील पाडळसरे धरणावर इलेट्रीक कारागीर म्हणून कामाला आहेत.
गावात पेटली नाही चूल
वैशाली यांच्या दुर्दैवी मृत्यूची वार्ता गावात सर्वत्र वार्यासारखी पसरल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. वैशाली यांचे पती संतोष कोळी व त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्य हे मनमिळावू असल्याने रुग्णालयात गावकर्यांनी एकच गर्दी केली शिवाय गावात चूलही पेटल्या नाहीत. मयताच्या पश्चात पती, एक मुलगा एक मुलगी, सासु सासरे, दिर भावजयी असा परीवार आहे. मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

