रावेर तालुक्यात बेकायदेशीर गुरांची वाहतूक : 30 गुरांची सुटका
रावेर : तालुक्यातील चोरवड चेक पोस्टवर गुरुवारी पहाटे गुरांनी भरलेला ट्रक उपप्रादेशिक विभागाच्या पथकाने पकडल्याने अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली. ट्रकमधील 30 गुरांची सुटका करण्यात आली असून ट्रक रावेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेवर असणार्या चोरवड चेक पोस्टवर गुरुवार, 7 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास बेकायदेशीर गुरांची वाहतूक करणारा ट्रक उपप्रादेशिक विभागाच्या पथकाने पकडला. ट्रकमधील 30 गुरांची सुटका करून त्यांची जळगावच्या गो शाळेत रवानगी करण्यात आली. रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले व पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी जाऊन ट्रक ताब्यात घेतला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.




