25 वर्षीय विवाहितेचा खून : आरोपीला अटक
अत्याचाराचा संशय : काटोल पोलीस ठाणे हद्दीतील घटना
काटोल : 25 वर्षीय विवाहित महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिरसावाडी शिवारातील सिमेंट पाईप कंपनीच्या आवारात मंगळवार, 5 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली. आरोपीस अटक करण्यात आली. आई-वडिलांना भेटण्यासाठी शिवणी (मध्य प्रदेश) येथून काटोलला महिला आल्यानंतर ही घटना घडली. अमलेश कुमार (18, रा.बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. काटोल परीसरातील काटोल-सावरगाव मार्गावरील सिरसावाडी शिवारात सिमेंट पाईप कंपनी आहे. या कंपनीत आरोपी अमलेश कुमार व मृत महिलेचे आई वडील कामगार म्हणून काम करतात. विवाहिता आई-वडिलांना भेटण्यासाठी सिरसावाडी आली असता बुधवारी तिचा याच कंपनीच्या परिसरात मृतदेह आढळला. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत चौकशी सुरू केली. शिवाय, अमलेश कुमारला ताब्यात घेत विचारपूस केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली. खून करण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी काटोल पोलिसांनी भादंवि 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
