धावत्या अप पुष्पक एक्स्प्रेसमध्ये विवाहितेवर अत्याचार : प्रवाशांना मारहाण करून लुटले


ईगतपुरी-कल्याण स्थानकादरम्यानची घटना : प्रवाशांच्या सतर्कतेने दोन दरोडेखोर ताब्यात : एकूण चार आरोपींना अटक

कल्याण : धावत्या अप लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये सुमारे आठ दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत प्रवाशांकडील मौल्यवान वस्तूंची लूट केली तर पतीसोबत प्रवास करणार्‍या 20 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना शुक्रवार, 8 रोजी रात्री घडली. या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. प्रवाशांनी हिंमत करून दोन दरोडेखोरांना पकडले तर कल्याण पोलिसांनी गुन्ह्याचा तपास हाती घेत आतापर्यंत एकूण चार आरोपींना अटक केल्याचे सांगण्यात आले.

ईगतपुरीतील बोगद्यापासून रेल्वेत चढले दरोडेखोर
सूत्रांच्या माहितीनुसार, अप लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून ट्रेन मुंबईच्या दिशेने येत असताना इगतपुरी स्थानक सोडल्यानंतर ट्रेन बोगद्याजवळ आल्यानंतर स्लो असतानाच आठ दरोडेखोर ट्रेनमध्ये चढले. त्यांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात करीत प्रवाशांकडील मोबाईल आणि पैसे हिसकावण्यास सुरूवात केली. प्रतिकार करणार्‍या प्रवाशांना दरोडेखोरांनी हातातील बेल्ट तसेच फायटरने बेदम मारहाण केली.

धावत्या ट्रेनमध्येच विवाहितेवर अत्याचार
धक्कादायक म्हणजे पतीसोबत प्रवास करणार्‍या 20 वर्षीय विवाहितेवर नराधम दरोडेखोरांनी धावत्या ट्रेनमध्येच अत्याचार केला. या प्रकाराला विवाहितेच्या पतीने विरोध केल्यानंतर त्यासदेखील बेदम मारहाण करून जखमी करण्यात आले. ईगतपुरी स्थानक आल्यानंतर प्रवाशांनी हिंमत करून दोन दरोडेखोरांना पकडले व लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर लोहमार्ग पोलिसांना दोघा आरोपींना कल्याण स्थानकावर उतरवून लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेत सुमारे एक लाखांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लांबवला. त्यात रोकडसह 13 मोबाईलचा समावेश आहे. कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली असून रेल्वेत गस्त वाढवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !