पोलीस शिपाई भरतीत व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पेपर सोडविण्याचा प्रयत्न दोघा उमेदवारांविरोधात गुन्हा
जळगाव : पोलीस शिपाई भरती परीक्षेसाठी शनिवारी झालेल्या लेखी परीक्षेदरम्यान उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रात व्हॉट्सअॅपद्वारे पेपर सोडवण्याचा प्रयत्न करणार्या परीक्षार्थी तरुणाला रंगेहात पकडण्यात आले तर याप्रकरणी कॉपी करणार्या तरुणांसह त्याला मदत करणार्याविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल. दरम्यान, जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
68 केंद्रावर झाली परीक्षा
पोलिस शिपाई भरती 2019ची प्रक्रीयेसाठी जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर 128 पदांसाठी शनिवार, 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता जळगाव व भुसावळ शहरातील 68 केंद्रांवर 21 हजार 690 उमेदवारांची 100 गुणांची बहुपर्यायी लेखी परीक्षा घेण्यात आली. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातही परीक्षा केंद्र होते. याठिकाणी योगेश रामदास आव्हाड (रा.पांझनदेव, पोस्ट, नागापूर, जि.नांदगाव) या परीक्षार्थी तरुणाने परीक्षा केंद्रात नजर चुकवून मोबाईल आणला होता. योगेशने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका आपल्या एका मित्राला पाठवली. त्यानंतर त्याच्या मित्राने प्रश्नांची उत्तर सोडवून त्याला पाठवायला सुरुवात केली. हा प्रकार सपोनि देवरे यांच्या लक्षात आल्यानंतर योगेशला तात्काळ परीक्षाकेंद्राच्या बाहेर नेत चौकशी करण्यात आली. याप्रकरणी योगेश रामदास आव्हाड आणि त्याचा मित्र (नाव निषपन्न नाही) अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे कळते. दरम्यान,जळगांव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कुल,जळगांव येथील परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थी उमेदवार प्रतापसिंग गुलचंद बालोद बैठक क्रमांक 7217059 हा परीक्षेत गैरप्रकार करत असतांना निदर्शनास आला आहे. सदरहू परीक्षार्थीवर देखील गुन्हा दाखल करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु आहे.

परीक्षा केंद्रावर मोबाईल, आक्षेपार्ह वस्तूंना होती बंदी
परीक्षा केंद्रावर पेन, पेन्सील, रबर, प्रवेशपत्र व शासकीय कामकाजासाठी ग्राह्य असलेले फोटोचे ळखपत्र ऐवढ्याच वस्तु उमेदवारांनी आणणे अपेक्षित होते. मोबाईल, आक्षेपार्ह वस्तुंना बंदी घालण्यात आली होती. या वस्तु आणल्यास उमेदवारांना अपात्र ठरवण्यात येणार होते. जळगाव जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर 128 पोलीस शिपाई पदांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. लेखी परीक्षेकरिता बोलाविण्यात आलेल्या एकूण 21 हजार 690 उमेदवारांपैकी 11 हजार 536 उमेदवार लेखी परिक्षेकरिता हजर होते व 10 हजार 154 उमेदवार लेखी परीक्षेकरीता गैरहजर होते. सदरहू परीक्षेकरीता 53.18 टक्के उमेदवार उपस्थित होते. वरील दोन घटनांचा अपवाद वगळतापोलीस शिपाई भरती परीक्षा अत्यंत सुरळीतपणे पार पडली.
