जामनेर शहरातील तरुणीची आत्महत्या


जामनेर : शहरातील जहागीरदारवाडा भागातील 19 वर्षीय तरूणीने रविवारी सायंकाळी सात वाजता आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. नम्रता पद्माकर पाटील असे मयत तरुणीचे नाव आहे. तरुणीने मृत्युपूर्वी सुसाईड नोट लिहिली असून पोलिसांनी ती जप्त केली आहे. महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीला मोबाईलवर पब्जी गेम खेळण्याचा नाद असल्याचे स्पष्ट झाले आहे.

घरी कुणी नसताना केली आत्महत्या
नम्रता पाटील (मुळ रा.भराडी, ता.जामनेर) ही आई, वडील व लहान भावासोबत नगारखाना भागात राहत होती. तिचे वडील याच भागातील एका डॉक्टरकडे सहाय्यक आहेत. त्यांच्या नवीन घराचे बांधकाम वाकी रस्त्यावर सुरु असल्याने तरुणीची आई त्या ठिकाणी गेली होती तर लहान भाऊदेखील आई सोबत असल्याने घरात कुणीही नसल्याचे पाहून तरुणीने घराच्या स्लॅबला दोर बांधून गळफास घेतला. आई घरी परतल्यावर ही घटना उघडकीस आली. मुलीचा मृतदेह पाहताच तिने हंबरडा फोडला. खोलीतच असलेली तिने लिहिलेली चिठ्ठी व मोबाईल पोलिसांनी जप्त केला. दरम्यान आपले आई-वडील सोन्यासारखे आहेत, त्यांचा या आत्महत्येशी काहीही संबंध नाही व आपण स्वतः आत्महत्या करीत असल्याचे तरुणीने चिठ्ठीत नमूद केले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट पाहणी केली. जामनेर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !