71 वर्षीय वृद्धाला अडवत सोन्याची अंगठी लांबवली : तिघांविरोधात गुन्हा
जळगाव : शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ अज्ञात तीन व्यक्तीने 71 वर्षीय वयोवृध्दाच्या हातातील आठ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जबरीने हिसकावून पळ काढला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कांतीलाल मिश्रीलाल जैन (71, रा.पंचमुखी हनुमान मंदिरा मागे, रणछोड नगर) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मेडिकलवर गोळ्या घेण्यासह भाजीपाला घेण्यासाठी ते घराबाहेर निघाले. शहरातील पंचमुखी हनुमान मंदिरासमोरील मेडिकल दुकानावरून त्यांनी गोळ्या घेतल्या व त्यानंतर तेथून सिंधी कॉलनी येथे भाजीपाला घेवून परत रीक्षाने पद्मावती मंगल कार्यालयाजवळ 11 वाजता रीक्षातून उतरले. याप्रसंगी घराकडे पायी जात असताना मागून अज्ञात व्यक्तीने उजवा हात पकडून बाबा थांबा असे सांगितले. त्यानंतर अजून दोन जण दुचाकीवर आले त्यांनी हातातील आठ ग्रॅम वजनाची 24 हजार रुपये किमतीची अंगठी बळजबरी काढून दुचाकीवरून पळ काढला. जैन यांनी यांनी आरडाओरड केली परंतू मदतीला कुणीच धावले नाही. याप्रकरणी कांतीलाल जैन यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

