लहान मुलांच्या लसीला अखेर केंद्र सरकारची मंजुरी
नवी दिल्ली : लहान मुलांच्या लसीला अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर आता दोन वर्षावरील मुलांना कोरोनाची लस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तिसर्या लाटेपूर्वी केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक पालकांना दिलासा मिळणार आहे. डीसीजीआयने कोव्हॅक्सिनला दिलेल्या परवानगीनंतर आता देशभरात लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिका, सिंगापूर यांच्यासह जगभरातील 20 देशांनी यापूर्वीच लहान मुलांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात केली आहे. भारतात कोव्हॅक्सिन लसीची तीन टप्प्यात चाचणी घेण्यात आली. सप्टेंबरपर्यंत ही चाचणी पूर्ण होऊन आशादायक चित्र पुढे आहे त्यामुळे ऑक्टोंबरमध्ये केंद्र सरकारने दोन वर्षावरील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लस देण्यास मंजुरी दिली आहे.
नागपूरात घेतली होती लहान मुलांवर चाचणी
भारत बायोटेक कंपनीच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीची मुलांवरील मानवी चाचणी नागपुरात घेण्यात आली होती. 2 ते 18 वयोगटांतील जवळपास 175 मुलांवर ही चाचणी झाली. कोव्हॅक्सिन लसीची ही चाचणी 2 ते 6, 7 ते 12 आणि 13 ते 18 या तीन वयोगटांत विभागणी करून घेण्यात आली होती. दिल्लीच्या एम्समध्येही लहान मुलांवर चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर या चाचणीचे रिपोर्ट आरोग्य मंत्रालयाला पाठवण्यात आले. त्यानंतर आता या लसीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आली.

