25 हजारांची लाच भोवली : ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात
नाशिक : वादग्रस्त जागेची पाहणी करून अहवाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी 25 हजारांची लाच मागणार्या दहेगाव (मनमाड), ता.चांदवड येथील ग्रामसेवकास नाशिक एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. ंद्रकांत तुकाराम पाटील (42, रा.सुंदरबन अपार्टमेंट, उपनगर, नाशिक रोड, नाशिक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 11 ऑगस्ट रोजी आरोपीने लाच मागितली मात्र ती स्वीकारली नाही मात्र एसीबीच्या पडताळणीत लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने मंगळवारी आरोपीला अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अहवाल बाजूने देण्यासाठी मागितली लाच
34 वर्षीय तक्रारदार यांनी दहेगाव (मनमाड), ता.चांदवड येथे घरकुल योजनेंतर्गत बांधलेल्या घराचा काही भाग अतिक्रमणात असल्यासंबंधने तक्रारदार यांचे विरुद्ध दिवाणी दावा दाखल होता. त्यामुळे तक्रारदार यांनी गटविकास अधिकारी पं.स.चांदवड यांना वादग्रस्त जागेची पाहणी करून अहवाल मिळण्यास विनंती केली होती. त्याकरीता गटविकास अधिकारी यांनी आलोसे यांना सदरचा अहवाल तयार करण्यास प्राधिकृत केले असता सदरचा अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने तयार करून देण्याकरीता संशयीत आरोपी ग्रामसेवकांने 25 हजार रुपये लाचेची मागणी 11 ऑगस्ट 2021 रोजी केली होती.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात हवालदार सुखदेव मुरकुटे, पंकज पळशीकर, संतोश गांगुर्डे, नाईक मनोज पाटील, प्रवीण महाजन, प्रकाश महाजन आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, मंगळवारी संशयीत आरोपीला दुपारी दोन वाजता अटक करण्यात आली. संशयीत आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
नाशिक कार्यालय दूरध्वनी क्रं – 0253- 2578230
टोल फ्रि क्रं. 1064
