एसीपी सुजाता पाटील यांची जामिनावर सुटका ; म्हणाल्या आपल्यावरील ट्रॅप धादांत खोटा
मुंबई : मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना एसीबीच्या पथकाने लाच प्रकरणात अटक केल्यानंतर पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. न्यायालयात पाटील यांना हजर केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. वकील नितीन सातपुते यांनी सुजाता पाटील यांची बाजू मांडत जोरदार युक्तिवाद केला. जामिनावर सुटल्यानंतर सुजाता पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट करून संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सत्याची बाजू घेऊन लढत आहे असा बनाव करणार्या मीडियावाल्यांनो, माझ्यावर झालेला ट्रॅप हा धादांत फॅब्रिकेटेड आहे. हे ऐकून कोर्टाने मला त्वरित सोडलेले आहे. ते पण बेंबीच्या डेटाला ताण पडेपर्यंत सांगा, अशा संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
खोट्या गुन्ह्यात फसवल्याचा दावा
सहा.पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना त्यांच्या वरीष्ठांच्या आदेशावरून तक्रारदारांनी पूर्वनियोजन करून खोट्या गुन्ह्यात फसवले. बनावट पंचनामा संशयास्पद आहे, पाटील यांच्या हातात कोणतीही रक्कम मिळाली नाही, तक्रारदाराने अँटीचेंबरच्या बंद दरवाज्यातील पलंगावरील रोख रक्कम फेकून दिली आणि एसीपी पाटील त्यावेळी बाथरूममध्ये असताना तक्रारदार पळून गेला. तक्रारदारांनी पॅकेट फेकून पळ काढला आहे याची पाटील यांना कल्पनाही नव्हती. पाटील यांच्या 34 वर्षांची स्वच्छ आणि पारदर्शक सेवेच्या नोंदी आहेत. त्यांच्या कार्यकाळात बरेच सामाजिक कार्य केले असून गरजू आणि गरीब लोकांना मदत केली असल्याचे वकील नितीन सातपुते यांनी म्हटले आहे.



