शेत वस्तीवर दोन महिलांवर बलात्कार : सहा आरोपी जाळ्यात
औरंगाबाद : पैठण तालुक्यातील बिडकीन जवळील तोंडोळी शेतवस्तीवर दरोडेखोरांनी हल्ला केला. या वस्तीवर मध्यप्रदेशातील आलेले कुटुंब राहत होते. दोन पुरुष आणि चार महिलांच्या या कुटुंबावर दरोडेखोरांनी हल्ला केला. यातील दोन पुरुषांना बांधून ठेवून दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची संताजपनक घटना 19 ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली होती. या प्रकरणी टोळीतील सहाव्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. किशोर अंबाजास जाधव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
वैजापूर व मुंबईत मुसक्या आवळल्या
तोंडोळी दरोडा प्रकरणी अटक झालेल्या तीन आरोपींची नावे नंदू भागीनाथ बोरसे, अनिल भाऊसाहेब राजपूत, किशोर अंबाजास जाधव अशी आहेत. बोरसे आणि राजपूत या दोघांना वैजापूर तालुक्यातील त्यांच्या नातेवाईकांच्या घरातून दुपारी अटक करण्यात आली. तिसरा आरोपी किशोर जाधव हा मूळचा सोनईचा आहे. मात्र अनेक वर्षांपासून तो पैठण तालुक्यातील गिधाडा भागात स्थायिक आहे. त्याच्याविरुद्ध डीपी चोरणे, दरोड्याची तयारी करणे, लूटमार करणे आदी गुन्हे दाखल आहेत. दरोड्याच्या घटनेनंतर तो पोलिसांच्या भीतीने चार दिवस शिवारातच उसात लपून बसला होता. मात्र, निसटून जाण्याच्या उद्देशाने त्याने मुंबईला पळ काढला. तो जसा मुंबईला गेला तसाच पोलिसांनी त्याला परत आणला. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

सहा आरोपी जेरबंद, सातव्याचा शोध सुरू
या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींपैकी सहा जणांना जेरबंद केले आहे. यात प्रभू पवार (म्होरक्या), विजय जाधव, सोमनाथ राजपूत, नंदू बोरसे, अनिल राजपूत, किशोर जाधव अशा सहा जणांना अटक झाली असून सातव्या दरोडेखोराचा शोध पोलीस घेत आहेत.
