कोविडमुळे भांडवली मूल्य सुधारीत न करण्याचा निर्णय
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोणत्याही इमारतीचे भांडवली मुल्य कोविड परिस्थितीमुळे सुधारित न करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. कोरोना विषाणुमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परीस्थितीमुळे निर्माण झालेल्या विविध अडचणींमुळे भांडवली मूल्य सुधारीत करण्यास 2021-22 करीता सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सवलत दिल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अंदाजे 1042 कोटी रुपये इतका महसूल तोटा होणार आहे.
महानगरपालिकेकडे दिले निवेदन
कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, या जागतिक महामारीने लागू केलेल्या टाळेबंदीमुळे तसेच सदर रोगाच्या भितीमुळे अनेक लहानमोठे उद्योगधंदे, शैक्षणिक संस्था, विकासाची कामे, कारखाने, बहुतांशी औद्योगिक क्षेत्रे, दैंनंदिन रोजगार बंद झाल्यामुळे सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांवर विपरित परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बहुतांशी मालमत्ताधारक / संस्था / लोकप्रतिनिधी यांजकडून मालमत्ता कर माफ करणे / सवलत देण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे निवेदन केले होते.

