संतोष जगताप हत्याकांड : मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात


लोणी काळभोर : उरूळी कांचन (ता.हवेली) येथे झालेल्या संतोष जगताप हत्याकांडातील मुख्य सूत्रधार उमेश सोपान सोनवणे (राहु, ता.दौंड) यास पिरफाटा (ता.शिरूर) येथे लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. संशयीताला न्यायालयाने त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यापूर्वी पवन गोरख मिसाळ (29) व महादेव बाळासाहेब आदलिंगे (26, दोघे रा.उरूळी कांचन, ता.हवेली) यांना अटक करण्यात आली असल्याने याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची एकूण संख्या तीन झाली आहे.

पूर्व वैमनस्यातून झाला खून
शुक्रवार, 22 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उरूळी कांचन येथे हॉटेल सोनाईसमोर संतोष संपतराव जगताप (रा.राहु, ता.दौंड) यांच्यावर तीन अनोळखी इसमांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात फायरींगमध्ये जगताप हे जागीच मयत झाले होते. त्यांचे अंगरक्षक शैलेंद्रसिंग व मोनुसिंग हे गंभीर जखमी झाले होते. यावेळी जगताप याचे अंगरक्षकाकडून केलेल्या फायरींगमध्ये मारेक-यांमधील स्वागत बाप्पू खैरे (25, रा.दत्तवाडी, उरूळी कांचन, ता.हवेली ) हा जागीच ठार झाला होता.

कट रचून केला गुन्हा
यापूर्वी अटक करण्यात आलेल्या पवन मिसाळ व महादेव आदलिंगे यांचेकडे करण्यात आलेल्या तपासदरम्यान त्यांनी सदरचा गुन्हा उमेश सोनवणे याचे सांगणेवरून कट रचून केल्याचे निष्पन्न झाले होते. परंतू सोनवणे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याचा शोध घेणेसाठी वरीष्ठ पोलीस निरीक्ष राजेंद्र मोकाशी यांनी तपास पथकास आदेश दिले होते. त्याअनुषंगाने तपास पथक सोनवणे याचा शोध घेत असताना तपास पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर यांना सोनवणे हा गुरुवार 28 ऑक्टोबर रोजी रात्री कानिफनाथ हॉटेल, पिर फाटा, ता. शिरूर येथे येणार असलेबाबत माहीती मिळाली.

आरोपीला दहा दिवसांची पोलीस कोठडी
महानोर यांनी मोकाशी यांना कळवून त्यांचे आदेशाप्रमाणे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, गणेश सातपुते, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत, संभाजी देविकर, बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे, दिगंबर साळुंके यांचेसमवेत सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला. काही वेळाने थांबले असताना बातमीप्रमाणे उमेश सोनवणे हा हॉटेल नजीक आलेचे निदर्शनास येताच तपास पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याला गुन्हयात अटक करून आज न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी यांनी त्याला 10 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

यांनी केली कारवाई
ही उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर नामदेव चव्हाण, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील, हडपसर विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !