आर्थिक वादातून सराईत गुन्हेगाराने केली महिलेची हत्या
नाशिक : आर्थिक वादातून सराईत गुन्हेगाराने महिलेची हत्या केल्याची घटना महात्मानगर परीसरातील संत कबीर नगर वसाहतीत घडली. पूजा संदीप आंबेकर (32, संत कबीरनगर झोपडपट्टी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. संतोष आंबेकर या संशयीताने हा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे.
तब्बल 20 वार करीत केला खून
गेल्या काही दिवसांपासून संत कबीर नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या पूजा आंबेकर व संतोष आंबेकर यांच्यामध्ये बुधवारी मध्यरात्री आर्थिक कारणातून वाद झाला. यावेळी संशयीत संतोष विष्णू आंबेकर (37) याने धारदार शस्त्राने हल्ला चढवून पूजाचा निर्दयी व निर्घृणपणे खून केला. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रीयाज शेख यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पूजाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला. घटनास्थळी न्याय सहायक वैद्यकीय पथकासह, श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्लेखोराची ओळख पटली
गेल्या काही दिवसांपूर्वीच संशयित संतोष आंबेकर हा दोन खुनांच्या गुन्ह्यात शिक्षा भागून कारागृहातून सुटला होता. गुरुवारी सकाळी दोघांत पैशाच्या वादातून भांडण झाले. तेव्हा संतप्त आंबेकर याने धारदार चाकू काढून पूजाच्या गालावर, पोटावर आणि मानेवर तब्बल 20 ते 25 वार केले. वर्मी खोलवर घाव बसल्याने अतिरक्तस्त्राव होऊन पूजा जागीच ठार झाली. मागील दहा ते बारा दिवसांपासून तो पूजा हिच्यासोबत येथील एका पत्र्याच्या खोलीत राहत होता, असे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोराची ओळख पटली असून त्याच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वीच संशयीत संतोष आंबेकर हा कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर आला होता. त्याने हा तिसरा खून केला असून पथक त्याच्या मागावर आहे. प्रारंभी आर्थिक वाद असल्याची चर्चा आहे.
