माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 19 पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी


मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने 19 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. देशमुख यांची तीन दिवसांची ईडीची कोठडी शनिवारी संपल्यानंतर ईडीने न्यायालयासमोर नऊ दिवसांच्या ईडी कोठडी वाढवण्याची मागणी केली मात्र ती न्यायालयाने फेटाळून लावली.

मनी लॉड्रींग प्रकरणी अटक
हे मनी लाँड्रिंग प्रकरण मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीशी संबंधित आहे. या प्रकरणात 12 तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर ईडीने देशमुख यांना 1 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा अटक केली. त्यांचा मुलगा हृषिकेश देशमुख यालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तपासादरम्यान, ईडीला अनिल देशमुख, त्यांची मुले सलील आणि ऋषिकेश यांच्या थेट नियंत्रणाखाली असलेल्या 13 कंपन्यांची माहिती मिळाली आहे. तसेच अशा 14 कंपन्या आहेत, ज्या अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या ताब्यात होत्या.

वझे, परमबीरने सट्टेबाजांकडून मोठी रक्कम उकळली
निलंबित पोलिस अधिकारी सचिन वझे आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी क्रिकेट सट्टेबाजांना अटक करण्याची धमकी देत त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली. मुंबई पोलिसांनी शनिवारी कोर्टाला ही माहिती दिली आहे. ही वसुली कोणाकडून व कशी झाली, याचा तपास करण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपासासाठी सचिन वझे याच्या कोठडीत सात दिवसांची वाढ करण्याची मागणी पोलिसांनी केली, ती न्यायालयाने मान्य केली. आता त्याला 13 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गोरेगाव पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यात कोठडीची मुदत संपल्यानंतर वझे यांना विशेष न्यायालयात हजर केले होते. बिल्डर आणि हॉटेल व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वझे यांना 1 नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले होते. परमबीर सिंग हे मे महिन्याच्या अखेरीपासून बेपत्ता आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !