19 वर्षीय नवविवाहितेवर नराधमांचा अत्याचार
वाळूज : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नाहीत. 19 वर्षीय नवविवाहितेवर सासरा व नणंदेच्या पतीने बलात्कार केला. याप्रकरणी पीडितेने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ऑक्टोंबर 2020 मध्ये श्याम विठ्ठल चव्हाण (25, मूळ रा.गेवराई, जि.बीड) याचे जालना जिल्ह्यातील तरुणीसोबत लग्न झाले. ती पतीसह वडगाव कोल्हाटी येथे नणंदेच्या घरी राहण्यास आली. ती घरी एकटी असल्याची संधी साधत नणंदेचा पती रंभाजी नावपुतेने तिच्यावर बलात्कार केला. ही घटना महिलेने पतीला सांगितली मात्र त्याने विश्वास ठेवला नाही. त्यानंतर पीडिता पती, सासू, सासरे, नणंद व तिच्या मुलांसह वडगाव कोल्हाटीत दोन खोल्या किरायने घेऊन राहू लागली. याच दरम्यान सासर्यानेसुद्धा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ती माहेरी निघून गेली. माहेरहून आल्यानंतर तिने सासरे व नणंदेच्या पतीविरोधात तक्रार दिली.
