पेट्रोकेमिकल मंत्र्याची फसवणूक : गुजरातमध्ये पेट्रोल पंप सील
सुरत : गुजरात सरकारमधील पेट्रोकेमिकल मंत्री मुकेश पटेल हे स्वत: पेट्रोल पंपावर फसवणुकीचा बळी ठरले आहेत. आपली फसवणूक होत असल्याचे दिसताच मुकेश पटेल यांनी रात्रीच जिल्हाधिकार्यांना फोनाफोनी करून हा पेट्रोल पंपच सील केला. जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे पेट्रोलियम मंत्री आणि ओलपाडचे भाजपा आमदार मुकेश पटेल हे रविवारी रात्री उशिरा त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील नियारा पेट्रोल पंपावर त्यांच्या खाजगी वाहनात पेट्रोल भरण्यासाठी पोहोचले होते. त्यांच्यासोबत ना पोलीस होते ना कोणता ताफा होता. कारण तो अचानक पेट्रोल पंप तपासणीसाठी गेले होते. यादरम्यान पंप कर्मचार्यांला डिझेल भरण्यास सांगितले. परंतु, पंपाच्या मीटरवर आकडे मात्र स्पष्ट दिसत नव्हते. याचे कारण त्यांनी पंपावरच्या कर्मचार्यांकडे विचारले. तसेच, पंपाचे मीटर बंद आहे, मी असेच डिझेल भरू का? अशी विचारणा मुकेश पटेल यांनी पंपाच्या व्यवस्थापकाकडे केली असता त्यांनी आपल्या कर्मचार्याचा बचाव करत मीटर मागे असल्याचे सांगितले.
रात्रीच पंप झाला सील
मंत्री मुकेश पटेल यांनी आधीच आपल्या कारमध्ये चार हजार रुपये किमतीचे डिझेल भरले मात्र पंपाच्या मीटरमध्ये पैसे व डिझेलची रक्कम स्पष्टपणे दिसत नव्हती. यावर त्यांनी पंपाच्या कर्मचार्याला जाब विचारला असता, तो नीट काही सांगू शकला नाही. यानंतर मंत्र्यांनी जिल्हाधिकार्यांना फोन करून या घोटाळ्याची माहिती दिली. तत्काळ पुरवठा विभागाचे अधिकारी आले आणि त्यांनी रात्रीच पंप सील केला.

सर्व पंपांच्या तपासणीचे आदेश
अधिकार्यांनी तपासणी केल्यानंतर पेट्रोल पंपावरच्या 12 नोझेलपैंकी 6 नोझेलला सील केले आहे. पेट्रोल पंपावरून नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे मुकेश पटेल यांनी म्हटले आहे. तसेच, गुजरातच्या सर्व पेट्रोल पंपाची तपासणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
