भोपाळमध्ये हॉस्पीटलला आग : चार बालकांचा होरपळून मृत्यू
इंदौर : देशात रुग्णालयांना आगी लागल्यामुळे निष्पाप नागरीकांचे बळी जात असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सोमवारी रात्री हमीदिया हॉस्पिटलच्या कमला नेहरू इमारतीतील शिशू विभागामध्ये आग लागल्याने चार निष्पाप बालकांचा होरपळून मृत्यू झाला तर 36 बालकांना दुसर्या वॉर्डमध्ये हलविण्यात आले. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
अहमदनगर घटनेची आठवण
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये कोरोना वॉर्डला आग लागली होती. यामध्ये 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्या आधी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातीलच लहान मुलांच्या विभागाला आग लागली होती. देशभरातही गुजरात, उत्तर प्रदेश सारख्या राज्यांत गेल्या दीड वर्षांत हॉस्पिटलना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

आगीच्या चौकशीचे आदेश
शिवराज सिंह यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करताना सांगितले की, आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. या घटनेची चौकशी आरोग्य आणि शल्य चिकित्सक विभागाचे एसीएस मोहम्मद सुलेमान करणार आहेत.
मंत्री विश्वास सारंग देखील हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी सांगितले की, शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता आहे. मृतांच्या पालकांना मुख्यमंत्र्यांनी 4-4 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
