सहा महिन्यात अल्पवयीन बालिकेवर चारशे जणांचा अत्याचार
बीड जिल्हा हादरला : नराधम आरोपींमध्ये पोलिसाचाही समावेश
बीड : अल्पवयीन बालिकेच्या असहाय्यतेचा फायदा घेत सहा महिन्यांत 400 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बीडमधील आंबेजोगाईमध्ये घडली. विशेष म्हणजे अत्याचार करणार्यांमध्ये एका पोलीस कर्मचार्याचा देखील समावेश आहे. याप्रकरणी बालविवाह लावून दिल्याच्या कारणावरून वडिलांसह नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
वडिलांना सांभाळण्यास दिला नकार अन् नराधमांनी केला अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या वडिलांनी तिचं एका तरुणासोबत बालविवाह लावून दिला होता. लग्नानंतर सासरी नवरा सांभाळत नसल्याने पीडित मुलगी आपल्या वडिलांकडे राहायला गेली. पण वडिलांनीही तिला सांभाळण्यास नकार दिला त्यामुळे असहाय्य आणि निराधार झालेली ही अल्पवयीन मुलगी अंबाजोगाई बसस्थानकावर येऊन राहू लागली. एकट्या मुलीला पाहून गेल्या सहा महिन्यात तब्बल 400 जणांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचार्याचा देखील समावेश आहे. बालहक्क कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे हा प्रकार समोर आल्यानंतर बालकल्याण समितीसमोर झालेल्या सुनावणीदरम्यान या घटनेला वाचा फुटली आहे.

अखेर गुन्हा दाखल
याप्रकरणी बालविवाह लावून दिल्याच्या कारणावरून वडिलांसह नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर अत्याचार करणार्या आरोपींवरही गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलीचा पुरवणी जबाब नोंदवला जाणार असून अत्याचार करणार्या अन्य आरोपींची नावं यामध्ये उघड होणार आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
