सर्वसाधारण गाड्यांचा दिलासा मात्र चाकरमान्यांना आता रेल्वे पासची प्रतीक्षा

मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांचे जनरल डबे बंद


भुसावळ : रेल्वेतर्फे विशेष गाड्या सोमवारपासून बंद केल्या जात आहे. त्यामुळे देशभरात आता सर्वसाधारण गाड्या धावण्यात सुरूवात झाली मात्र या गाड्यांना जनरल डबे नसतील तसेच अप-डाऊन करणार्‍यांसाठी मासिक पास देण्याबाबत रेल्वे बोर्डाकडून स्पष्ट सूचना आलेल्या नाही. त्यामुळे अपडाऊन करणार्‍यांना पास काढण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. इटारसी आणि बडनेरा मार्गावर पावणेदोन वर्षानंतर, सोमवारपासून मेमू धावण्यात सुरूवात झाली आहे.

मेमू चालवण्याचा निर्णय
पॅसेजर गाड्या कधी सुरू होतात याकडे प्रवाशांचे लक्ष लागले होते. रेल्वेने पॅसेंजर गाड्यांऐवजी आता मेमू गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारपासून भुसावळ ते इटारसी व भुसावळ ते बडनेरा या मार्गावर दोन मेमू गाड्या धावणार आहे. या गाड्यांचे जनरल तिकीट प्रवाशांना मिळेल. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.

तिकिटे होणार स्वस्त
मेल, एक्स्प्रेस गाड्यांना जनरल डबे जोडण्याबाबत स्पष्ट सूचना रेल्वे प्रशासनाला प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे सोमवारपासून धावणार्‍या सर्वसाधारण गाड्यांना जनरल डबा नसेल. प्रवाशांना आरक्षण तिकीट काढूनच या गाड्यांमध्ये प्रवास करावा लागेल. विशेष दर्जा काढल्याने या गाड्यांचे तिकीट दर 10 ते 33 टक्के कमी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मेमू गाड्यांमुळे सुविधा
भुसावळ येथून सावदा, रावेर, बर्‍हाणपूर तसेच वरणगाव, बोदवड, मलकापूर येथे शिक्षण व कामानिमित्त अपडाऊन करणारे विद्यार्थी व चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. रेल्वेचा सवलत पास मिळेल अशी या सर्वांना आशा होती. मात्र, रेल्वे बोर्डाकडून पास देण्याबाबत स्पष्ट सूचना नसल्याने अप-डाऊन करणार्‍यांना आता मेमू गाडीत जनरल तिकीट काढून प्रवास करता येईल.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !