विवाहितेचा मृत्यू ; संतप्त माहेरच्यांनी सासरच्यांना चोपले
औरंगाबाद : विवाहितेचा घातपाती मृत्यू झाल्याचा संशय माहेरच्यांना आल्यानंतर संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी सासरच्यांना चांगलेच झोडपून काढले. बिडकीन परिसरातील विवाहितेच्या मृत्यूनंतर औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात चांगलाच गोंधळ पहायला मिळाला. विजेच्या धक्क्याने सदर विवाहितेचा मृत्यू झाल्याचे सासरच्या मंडळींकडून सांगण्यात आले मात्र सदर महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय घेत, सासरच्या मंडळींना मारहाण केली. यामुळे शहरातील घाटी रुग्णालय परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
रुग्णालयातच सासरच्या मंडळींना बेदम मारहाण
बिडकीन येथील विवाहितेला वीजेचा धक्का लागल्याने तिला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय माहेरच्या मंडळींना आहे. शुक्रवारी विवाहितेचा मृत्यू झाल्यानंतर मात्र माहेरच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात चांगलाच गोंधळ माजवला. सासरच्या मंडळींना त्यांनी मारहाण सुरु केली. अखेर सुरक्षा रक्षकांच्या मध्यस्थीनंतर हा गोंधळ शमला.

