माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी फेटाळले सर्व आरोप
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप केल्यानंतर चर्चेत आलेले गुन्हे दाखल झाल्यानंतर फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गुरुवारी अखेर मुंबईत दाखल झाले. गोरेगाव येथे दाखल करण्यात आलेल्या खंडणी वसुली प्रकरणाच्या तपासासंदर्भात तपास यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी परमबीर सिंग आज थेट कांदिवलीमधील गुन्हे शाखेच्या कक्ष 11 मध्ये हजर झाले. तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर सिंग कक्ष 11 मधून बाहेर पडले. तब्बल सात तास चाललेल्या चौकशीत सिंग यांनी त्यांच्यावरील वसुलीचे सर्व आरोप फेटाळले असल्याची माहिती आहे.
न्यायालयाने दिले अटकेपासून संरक्षण
परमबीर सिंग चंदीगडमध्ये असल्याची माहिती बुधवारी मिळाली होती. आपण देशातच असून जीवाला धोका असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यास दोन दिवसांत चौकशीला हजर राहू, असे परमबीर यांनी कोर्टात वकिलामार्फत स्पष्ट केले होते. त्यानुसार कोर्टाने परमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला होता.


सिंग यांच्याविरोधात तब्बल सहा गुन्हे दाखल
कोर्टाच्या निर्णयानंतर परमबीर सिंग आज मुंबईत दाखल झाले आहेत. परमबीर यांच्याविरोधात मुंबई व ठाणे येथे सहा गुन्हे दाखल आहेत. आपल्याविरोधात मुंबईत सुरू असलेल्या सीबीआय चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे परमबीर सिंग यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.