भुसावळात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत होणार अनेकांचे ‘इनकमिंग’
भुसावळात 5 डिसेंबरला विकासकामांचे उद्घाटन : माजी मंत्री खडसेंनी घेतली शहरात आढावा बैठक : रस्त्यांची कामे मार्गी लावण्याची सूचना
भुसावळ : शहरात पालिकेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचे लोकार्पण, भुसावळसह विभागातील भाजपमधील पदाधिकार्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार रविवार, 5 डिसेंबर रोजी भुसावळ दौर्यावर येत आहेत. यानिमित्त त्यांची शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर जाहीर सभा होणार आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी गुरुवारी स्वीकृत नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांच्या ‘अटल’ निवासस्थानी नगरसेवक, पदाधिकार्यांच्या बैठकीत ही माहिती दिली. बैठकीत माजी मंत्री खडसेंनी भाजपमधून सध्या राष्ट्रवादीच्या गोटात समाविष्ट झालेल्या नगरसेवकांना या दौर्याची माहिती दिली. दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपासह अन्य पक्षातील कार्यकर्त्यांसह पदाधिकार्यांचा राष्ट्रवादीत प्रवेशही होणार आहे त्यामुळे आगामी काळात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय-काय समीकरणे बदलतात? याकडे राजकीय समीक्षकांचे लक्ष लागले आहे.
विविध विकासकामांचे उद्घाटनही होणार
भुसावळसह, यावल, रावेर, सावदा, फैजपूर, मुक्ताईनगर व बोदवड येथील अनेक पदाधिकारी, नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. भुसावळ शहरात पालिकेच्या माध्यमातून उभारणी झालेले दोन ते तीन पूल, हनुमान नगरातील उद्यान, सरदार वल्लभभाई पटेल पुतळा नूतनीकरण अशा विकासकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येईल. या दौर्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक घेवून तयारीला गती देण्यात येईल.


यांची बैठकीला उपस्थिती
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, नगराध्यक्ष रमण भोळे, स्वीकृत नगरसेवक प्रा.सुनील नेवे, माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, नगरसेवक मुकेश पाटील, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, पाणीपुरवठा सभापती किरण कोलते, अॅड.बोधराज चौधरी, पुरुषोत्तम नारखेडे, राजू सूर्यवंशी, दिनेश नेमाडे आदी उपस्थित होते.
कामांचा घेतला आढावा
या बैठकीत खडसेंनी शहरातील रखडलेल्या रस्त्यांच्या प्रश्नी ठेकेदार विनय बढे यांची झाडाझडती घेतली. रेल्वे हद्दीतील अतिक्रमणात विस्थापित झालेल्यांना घरे देण्यासाठीच्या योजनेचा मुुंबईतील अधिकार्यांकडून मोबाइलद्वारे संपर्क साधला. पालिकेतील टाऊन प्लॅनिंग विभागातील रीक्त पदे भरणे, शवविच्छेदनासाठी कायमस्वरुपी डॉक्टरची नियुक्ती ही माहिती जाणून घेतली. मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व पालिकेतील विभागप्रमुख उपस्थित होते.
